लसीकरणासाठी झुंबड; कोरोना साखळी कशी तुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:34+5:302021-05-12T04:42:34+5:30

वाशिम : केंद्र सरकारकडून १० मे रोजी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीचे डोस देण्याला ११ मेपासून सुरुवात होताच, लसीकरण केंद्र ...

Rush for vaccination; How will the corona chain break? | लसीकरणासाठी झुंबड; कोरोना साखळी कशी तुटणार?

लसीकरणासाठी झुंबड; कोरोना साखळी कशी तुटणार?

वाशिम : केंद्र सरकारकडून १० मे रोजी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीचे डोस देण्याला ११ मेपासून सुरुवात होताच, लसीकरण केंद्र परिसरात दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड केली. लस ही महत्त्वाची आहेच; पण त्याचबरोबर लसीकरण केंद्रातील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव तर होणार नाही ना, याची दक्षताही घेणे आवश्यक ठरत आहे. दरम्यान, पहिला डोस घेतल्यानंतर ३८ ते ४५ दिवसांचा कालावधी होत असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्यक्रमाने दुसरा डोस देण्यात येणार असल्याने १२ मेपासून पुढील आदेशापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे.

देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती झाल्याने आणि लस घेतल्यानंतर कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून येत नसल्याचे समोर येत असल्याने लस घेण्यासाठी आता नागरिकांची एकच धावपळ सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान, गत एका महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत आहे. लसीअभावी अर्धेअधिक केंद्र प्रभावित झाले आहेत. १० मे रोजी जिल्ह्याला बारा हजार २०० कोविशिल्ड आणि ३६६० कोव्हॅक्सिन लसीचे डोस प्राप्त झाले. ११ मेपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्याला सुरुवात होताच, जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस ही महत्त्वाची आहेच; पण त्याचबरोबर केंद्रातील गर्दीतून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षताही नागरिक, प्रशासनाने घेणे आवश्यक ठरत आहे.

०००

बॉक्स

१८-४४ वयोगटाचे लसीकरण लांबणीवर

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर ४५ ते ५० दिवसांच्या आत त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेऊन ४० दिवसांचा कालावधी होत आहे. त्यामुळे या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने १२ मेपासून पुढील आदेशापर्यंत १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय ११ मे रोजी घेतला. मागणीच्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने १८-४४ वयोगटाचे लसीकरण लांबणीवर पडले आहे. यामुळे या गटातील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

००००००

बॉक्स

वाशिम येथील केंद्रात धक्काबुक्की

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या केंद्रात लस घेण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजेपासूनच नागरिक रांगेत उभे राहिले. लसीकरण सुरू झाल्यानंतर ११ वाजेच्या सुमारास ऊन असल्याने रांगेतील नागरिकांनी सावलीचा आधार घेण्यासाठी केंद्र परिसरात एकच गर्दी केली. यामध्ये काही नागरिकांमघ्ये धक्काबुक्कीदेखील झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार पाहून काही ज्येष्ठ नागरिकांनी घरचा रस्ता धरल्याचे दिसून आले.

०००००००

बॉक्स

लसीचे १६ हजार डोस मिळाले

१० मे रोजी जिल्ह्यात लसीचे १६ हजार डोस मिळाले आहेत. यामध्ये कोविशिल्डचे १२,२०० आणि कोव्हॅक्सिनच्या ३६६० डोसचा समावेश आहे. यापैकी काही डोस ११ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनादेखील देण्यात आले. १२ मेपासून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

००००

कोट बॉक्स

जिल्ह्यात ११ मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. दुसरा डोस आवश्यक असल्याने १२ मेपासून पुढील आदेशापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येत आहे. १२ मेपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: Rush for vaccination; How will the corona chain break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.