सोयाबीन बियाण्यांसाठी शेतक-यांची धावपळ
By Admin | Updated: May 12, 2015 01:21 IST2015-05-12T01:21:28+5:302015-05-12T01:21:28+5:30
खरीप हंगाम नियोजन ; उगवण क्षमता तपासून घरगुती बियाणे वापरा.
_ns.jpg)
सोयाबीन बियाण्यांसाठी शेतक-यांची धावपळ
वाशिम : गतवर्षी झालेल्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीमुळे सोयाबीन उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली. यावर्षी पेरण्यासाठी शेतकर्यांकडे बियाणेच नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ होत आहे. कृषी विभागाच्यावतीनेही सोयाबीनची विक्री न करता त्याची तपासणी करून बियाणे म्हणून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकरी जिल्हय़ात येवून जादा भावाने सोयाबीन विकत घेऊन जात आहेत. गतवर्षी सोयाबीन काढणीची वेळ आली असता व काहींनी काढणी करून गंजी लावलेली असताना जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन ओले झाले. काही ठिकाणी तर काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनला कोमसुद्धा फुटले होते. यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. सोयाबीनच्या घटमुळे येणार्या खरिप हंगामात शेतकर्यांसमोर पेरणीसाठी बियाणे कुठून आणायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्हय़ात सोयाबीनचा तुटवडा पाहता कृषी विभागाच्यावतीने सोयाबीनची विक्री थांबवा व घरगुती सोयाबीनची तपासणी करुन जिल्हय़ातीलच शेतकर्यांना बियाणे म्हणून देण्याचे आवाहन केल्या जात आहे. जिल्हय़ात गतवर्षी सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी इतर जिल्हय़ाच्या तुलनेत सोयाबीन उत्पादन जिल्हय़ाचे जास्त आहे. जिल्हय़ातील शेतकर्यांनी जिल्हय़ामधीलच शेतकर्यांना सोयाबीन बीज म्हणून दिल्यास याचा तुटवडा जाणवणार नाही; परंतु जिल्हय़ातील काही शेतकरी परजिल्हय़ात असलेल्या आपल्या नातेवाइकांना तसेच जादाभाव मिळत असल्याने परजिल्हय़ातील शेतकर्यांना सोयाबीनची विक्री करीत आहेत. यामुळे जिल्हय़ातील शेतकर्यांना मात्र सोयाबीनसाठी धावपळ करावी लागत आहे.