१९१.१७ कोटी रुपयांचा आराखडा
By Admin | Updated: February 6, 2016 02:28 IST2016-02-06T02:28:55+5:302016-02-06T02:28:55+5:30
वाशिम जिल्हा वार्षिक योजनेसाठी १0६ कोटी रुपये अतिरिक्त निधीची मागणी.

१९१.१७ कोटी रुपयांचा आराखडा
वाशिम : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २0१६-१७ च्या राज्यस्तरीय बैठकीत वाशिम जिल्ह्यासाठी १0६ कोटी ६३ लक्ष ९७ हजार रुपये अतिरिक्त निधीची मागणी सादर करण्यात आली. तसेच जिल्ह्याचा एकूण १९१ कोटी १७ लक्ष ९७ हजार रुपये निधीचा आराखडा सादर करण्यात आला. वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभाग (वित्तीय सुधारणा) प्रधान सचिव विजय कुमार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्यासह आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी आदी उपस्थित होते. राहुल द्विवेदी यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २0१६-१७ आराखड्याचे सादरीकरण केले. ते म्हणाले, सन २0१६-१७ च्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी ८४ कोटी ५४ लक्ष रुपयांची कमाल र्मयादा देण्यात आली होती. त्यानुसार आराखडा तयार केला. अंमलबजावणी यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार जिल्ह्याला १0६ कोटी ६३ लक्ष ९७ हजार रुपयांचा अतिरिक्त निधी आवश्यक आहे. कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामाजिक सेवा, सामान्य सेवा आणि नाविन्यपूर्ण योजनांवर हा अतिरिक्त निधी खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्याचा एकूण १९१ कोटी १७ लक्ष ९७ हजार रुपये निधीचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या कामांची माहिती घेतली. कामांना पुरेसा निधी शासन उपलब्ध करून देत आहे. मात्र सर्व कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच वाशिम जिल्ह्याच्या अतिरिक्त निधी मागणीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र लोणी आराखडा, श्रीक्षेत्र पोहरादेवी आराखडाविषयी माहिती घेतली.