खासगी विनाअनुदानित शाळांचे २.४0 कोटी रुपये थकले!
By Admin | Updated: April 19, 2016 02:28 IST2016-04-19T02:28:31+5:302016-04-19T02:28:31+5:30
३६ जिल्ह्यांसाठी केवळ १0 कोटींचा निधी मंजूर; वाशिम जिल्ह्याला मिळणार तुटपूंजा निधी.

खासगी विनाअनुदानित शाळांचे २.४0 कोटी रुपये थकले!
सुनील काकडे / वाशिम
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 'आरटीआय अँक्ट'अंतर्गत प्रवेश देणार्या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे सुमारे २.४0 कोटी रुपये थकीत असताना शासनाने १६ एप्रिल रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी केवळ १0 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यापैकी वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला तुटपूंजा निधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून, संबंधित संस्थाचालकांसोबतच प्राथमिक शिक्षण विभागातही यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश दिला जातो. त्यापोटी येणार्या खर्चाची प्रतिपूर्ती शासन करते. मात्र, जिल्ह्यातील सन २0१४-१५ मधील ५२ शैक्षणिक संस्थांचे ९0 लाख आणि २0१५-१६ मधील ८८ संस्थांचे १.५0 कोटी, असे एकंदरित २.४0 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २0१४-१५ मधील ५२ शैक्षणिक संस्थांमधील ७८३ विद्यार्थ्यांचा ८९ लाख रुपयाचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला; मात्र हा निधी अद्यापही मिळाला नाही. अशातच सन २0१५-१६ चे शैक्षणिक सत्र संपले असून, या सत्रात ८८ संस्थांनी सुमारे १२00 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यापोटी संबंधित शैक्षणिक संस्थांना जवळपास १.५0 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. असे असताना शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता उणापुरा १0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातून वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला तुटपूंजा निधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.