वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावाची स्वच्छता अबाधित ठेवण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी २५ सप्टेंबर रोजी केले. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद या ऑनलाइन उपक्रमात ते बोलत होते.
जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात असून जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी यात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन निकम यांनी केले. या संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लीटर पाणी व प्रत्येक घरी नळ जोडणी देणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता या सोबत होणाऱ्या बाबी असून सरपंचांच्या सकारात्मक सहभागाशिवाय शक्य नाही. ‘स्थायित्व व सुजलाम अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
.........
चर्चेत सरपंचांचादेखील सहभाग!
या चर्चेत सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव), पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी सहभाग घेतला. माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी पाणी व स्वच्छतेबाबतच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला.
मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणाची तांत्रिक बाबीचे संचालन जिल्हा कक्षाचे वित्त व संपादणूक सल्लागार सुमेर चाणेकर यांनी केले. सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने यांनी आभार मानले.