अज्ञात तापेच्या साथीने रिधोराग्राम फणफणले
By Admin | Updated: September 4, 2014 23:03 IST2014-09-04T23:03:09+5:302014-09-04T23:03:09+5:30
मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथे अज्ञात तापाची साथ पसरली आहे.

अज्ञात तापेच्या साथीने रिधोराग्राम फणफणले
रिधोरा : मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथे अज्ञात तापाची साथ पसरली असून, गावातील प्रत्येक घरात या तापाची लागण झालेले रुग्ण दिसत आहेत. गावभरात अज्ञात तापासह साथीचे आजार पसरले असतानाही आरोग्य विभागाकडून मात्र अद्यापही यावर नियंत्रणासाठी पावले उचण्यात आलेली नाहीत. या तापाने आजारी पडलेल्या काही रुग्णांना वाशिम येथे, तर काहींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पावसाळय़ाच्या दिवसांत गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य, दुषित पाणी पुरवठा व डासांमुळे गावात आजारांनी थैमान घातले आहे. यामध्ये मलेरिया, डायरिया आदि आजारांचाही समावेश असून, अज्ञात तापाची लागण झालेल्या रुग्णाच्या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. गावात पुरेशी उपचार सुविधा नसल्यामुळे रुग्ण मालेगाव येथे उपचारासाठी जात आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. उल्लेखनीय बाब अशी, की रिधोरा हे गाव मेडशी ग्रामीण रुग्णालयापासून ४ किलोमीटर अंतरावर असतानाही अद्याप आरोग्य विभागाचे पथक येथे दाखल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
रिधोरा येथे अज्ञात तापाची साथ पसरल्याची माहिती आजच मिळाली असून, उद्या या गावात जाऊन वापराच्या पाण्यात टाकण्यासाठी टेमिफॉस नावाचे औषध दिले जाईल. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याचे मेडशी येथील वैद्यकीय अधिकारी अशोक शिंदे यांनी सांगीतले.
** दोन शाळकरी मुलांना डेंग्युची लागण
मेडशी येथे अज्ञात तापाने थैमान घातले असतानाच गावातील दोन शाळकरी मुलांना डेंग्युची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. यामध्ये संतोष विलास इंगोलेसह आणखी एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. या दोघांना डेंग्युची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे. या दोन्ही मुलांवर अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.