जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून नागरिकांना मुक्त संचार करण्यास सक्त मनाई राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, रात्रीच्या वेळी सुरू राहणारी औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी. बस व खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हाय-वेवरील पेट्रोल पंप, ढाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील. जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, बाजारपेठा सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहतील. नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्यासाठी परवानगी राहील. ठोक भाजी मंडई सकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहतील. सकाळी ८.३० वाजेपर्यंत मॉर्निंग वॉक व व्यायामास सूट राहील. परंतु, मॉर्निंग वॉक व व्यायाम करताना एका ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत, ह्याची काळजी घ्यावी. दुधाचे घरपोच वितरण तसेच रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे घरपोच वितरण सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत अनुज्ञेय राहील.
सर्व प्रकारचे गर्दी होणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, बँक सेवा वगळून इतर शासकीय कार्यालये मंजूर पदाच्या ५० टक्के प्रमाणात सुरू राहतील. शक्यतो घरूनच काम करण्यात (वर्क फ्रॉम होम) यावे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना ह्या एकूण मंजूर पदाच्या ५० टक्के प्रमाणात सुरू राहतील. सदर ठिकाणी आरोग्य तपासणीची व्यवस्था असावी व अभ्यांगतांची नोंदवही ठेवून नोंदी घेण्यात याव्या. थर्मल स्क्रीनिंग मशीन व पल्स ऑक्सिमीटर ठेवण्यात यावे. प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सिजन पातळी यांची नोंद नोंदवहीत ठेवण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्व सोयी-सुविधा ठेवण्यात याव्यात. संचारबंदी काळात जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील.
.......................
मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थापना, कार्यालयात, प्रवासा दरम्यान नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
................
गृह विलगीकरण नियमांचे उल्लंघन केल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी
जिल्ह्यात गृह विलगीकरणास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. गृह विलगीकरणाची माहिती स्थानिक संस्थेस तसेच गृह विलगीकरण ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षेत येते, त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे शिफारस करावी. संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी गृह विलगीकरणाबाबतचे आदेश निर्गमित करावेत. गृह विलगीकरण मंजूर केलेल्या व्यक्तीच्या घराच्या दर्शनी भागात १४ दिवस कोविड रुग्ण असल्याबाबतचा फलक लावण्यात यावा. कोरोनाबाधित रुग्णांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात यावे.