महसूलमंत्री खडसे यांच्या पुतण्यासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
By Admin | Updated: January 1, 2015 00:38 IST2015-01-01T00:20:36+5:302015-01-01T00:38:07+5:30
आकोट बाजार समितीत ८0 लाखांचा अपहार.

महसूलमंत्री खडसे यांच्या पुतण्यासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
आकोट (अकोला) : आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत बांधकामात खोटे दस्तऐवज करून संगनमताने ८0 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयाच्या आदेशावरून बुधवार, ३१ डिसेंबर रोजी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २00८ ते २0१४ या कार्यकाळामध्ये बाजार समितीमधील बांधकाम करण्यात आले. सदर बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार १0 जानेवारी २0१४ ला शासनाकडे माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी केली होती. त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून थर्ड पार्टी टेक्निकल इन्स्पेक्शन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये कृ.उ.बा.स.चे सभापती रमेश हिंगणकर, माजी सचिव मोहसीन बेग मिर्झा, वास्तुशिल्पकार हरीश खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांनी संगनमत करून मोजमाप पुस्तिकेमध्ये न झालेल्या तसेच अर्धवट झालेल्या कामांचे खोटे मोजमाप लिहून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा आहे, असे भासवून त्यानुसार ८0 लाख १३ हजार ३ रुपये एवढय़ा शासकीय निधीचा अपहार केल्याचे अहवालात नमूद आहे.
या प्रकरणी सर्व दस्तऐवज घेऊन माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी आकोट शहर पोलिसात तक्रार दिली होती. सदर तक्रार पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दुय्यम निबंधक यांच्याकडे चौकशीकरिता पाठविली होती. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या संशयावरून पुंडकर यांनी न्यायालयात १५६ (३) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर न्यायाधीश व्ही.एन. मोरे यांच्या समक्ष युक्तिवाद होऊन तक्रारीतील नमूद आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले. या आदेशावरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, तत्कालीन सचिव मोहसीन बेग मिर्झा रा.आकोट, वास्तुशिल्पकार हरीश काशीनाथ खडसे अकोला, कंत्राटदार सुनील अग्रवाल परतवाडा यांचे विरुद्ध भादंविच्या ४0६, ४२0, ४६0, ४६८, ४७१, ४७0, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील आरोपी हरीश खडसे हे राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ए.पी.आय. नितीन पाटील करीत आहेत.