गौणखनिजातून ३.३७ कोटींचा महसूल
By Admin | Updated: April 4, 2015 02:07 IST2015-04-04T02:07:38+5:302015-04-04T02:07:38+5:30
एका वर्षातील कारवाई; तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाची संयुक्त मोहीम.

गौणखनिजातून ३.३७ कोटींचा महसूल
वाशिम : अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणीचा दंड आणि स्वामित्वधन यामधून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाने तीन कोटी ३७ लाख १३ हजार ८0 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ दरम्यानचा हा लेखाजोखा आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौणखनिजाची वाहतूक करणार्या १३७ वाहनांकडून वाशिम तहसील कार्यालयाने ११ लाख ७८ हजार ८५0 रुपये दंड वसूल केला आहे. गौणखनिजाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र अनेकजण शासनाची परवानगी न घेता चोरट्या मार्गावर बिनधास्त गौणखनिजाची वाहतूक करीत असल्याचे वास्तव आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय आणि गौणखनिज कार्यालयाचे पथक कारवाई करते. एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण १३७ वाहनं गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आली. यामध्ये अवैध रेती वाहतुकीची ७६ प्रकरणे आणि अवैध डब्बर, मुरूम वाहतुकीच्या ६१ प्रकरणांचा समावेश आहे. अवैध गौणखनिजप्रकरणी ११.७८ लाखाचा महसूल तहसील कार्यालयाला मिळाला आहे. वाशिम तालुक्यात चार जणांविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वाशिम तालुक्यातील रेती व मुरूम घाटाच्या रॉयल्टीमधून (स्वामित्वधन) एक कोटी ९ लाख ८१ हजार २३७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय वाळूघाट लिलावाच्यावेळी अर्ज फि यामधून ६६ हजार ५00 रुपये महसूल मिळाला आहे. वाशिम तहसील कार्यालयाला अवैध गौण खनिज, अर्ज फी व रॉयल्टी यामधून एक कोटी २२ लाख २६ हजार ५८७ रुपये महसूल प्राप्त झाला आहे.