बडनेरा-वाशिम रेल्वे मार्गासाठी बाजार समितीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:16+5:302021-02-05T09:26:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावित नरखेड-बडनेरा-वाशिम रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी विविध स्तरातून मागणी होत ...

बडनेरा-वाशिम रेल्वे मार्गासाठी बाजार समितीचा ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावित नरखेड-बडनेरा-वाशिम रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी विविध स्तरातून मागणी होत असताना आता कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने या मार्गामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेत, या मार्गाला मंजुरी देण्याची मागणी करणारा ठराव पारित केला आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना २९ जानेवारी रोजी पत्रही पाठविण्यात आले.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार प्रकाश डहाके यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती ही केंद्र शासनाच्या ई-नाम अंतर्गत समाविष्ट झालेली विदर्भातील पहिली बाजार समिती असून, बडनेरा-वाशिम हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास वाशिम जिल्हा आणि पश्चिम विदर्भासह मराठवाड्याच्या कृषी विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच या रेल्वे मार्गामुळे दिल्ली येथून नागपूरमार्गे दक्षिण भारताकडील रेल्वे प्रवासाचे अंतर जवळपास ३०० किलोमीटरने कमी होऊन प्रवाशांचा ४ ते ५ तासांचा वेळही वाचणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण करून हा रेल्वेमार्ग योग्य ठरणार असल्याचे संकेतही दिले आहेत. ही बाब लक्षात घेता, या रेल्वेमार्गाला त्वरित मंजुरी देऊन त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.