घंटागाडी खरेदी प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल शासनदरबारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:32+5:302021-09-07T04:50:32+5:30
संतोष वानखडे वाशिम : वाशिम शहरातील घंटागाडी खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आल्याने ...

घंटागाडी खरेदी प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल शासनदरबारी!
संतोष वानखडे
वाशिम : वाशिम शहरातील घंटागाडी खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आल्याने अनियमितता करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, बहुचर्चित टेम्पल गार्डन, नाट्यगृहाच्या बांधकामाचीही चौकशी पूर्णत्वाकडे आल्याने सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे.
जिल्ह्यात सध्या भ्रष्टाचार, घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपावरून राजकारण चांगलेच तापत आहे. वाशिम नगरपरिषदेंतर्गत झालेल्या विविध विकासात्मक कामे आणि घंटागाडी खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे करण्यात आल्या. याची दखल घेत, या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार, सुरुवातीला घंटागाडी खरेदी प्रकरणाची चौकशी हाती घेण्यात आली. नवीन १७ घंटागाडी खरेदीमध्ये ४२ लाख ५० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवक ॲड.विनोद खंडेलवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे केली होती. या प्रकरणी संबंधितांचे जबाब, निविदा प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात नेमके काय दडले, ठपका ठेवण्यात आला की क्लीन चिट मिळणार, याबाबत सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. या अहवालावर नगरविकास विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
...............
घंटागाडी खरेदीच्या तक्रारीत नमूद काय?
नगरपरिषदेने प्रकल्प अहवालानुसार १७ घंटागाड्या खरेदी करण्याकरिता ३ डिसेंबर, २०२० रोजी पोर्टलवर निविदा प्रसिद्ध केली होती. प्रकल्प अहवाल व ऑर्डर शिटनुसार एकूण १७ घंटागाड्या सहा लाख रुपये प्रत्येकी, याप्रमाणे एकूण १ कोटी २ लाख रुपयाची निविदा प्रसिद्ध करणे बंधनकारक होते, परंतु निविदा प्रसिद्धीमध्ये वाहन खरेदी निविदेची रक्कम १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपये दाखविण्यात आली. यावरून ४२ लाख ५० हजार रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणी पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार, चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल नगरविकास विभागाच्या दालनात आहे.
......................
टेम्पल गार्डन, नाट्यगृहाच्या चौकशीकडे लक्ष
वाशिम शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या टेम्पल गार्डन आणि नाट्यगृहाच्या कामात अनियमितता, गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी आमदार ॲड.विजयराव जाधव यांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे. चौकशी पूर्णत्वाकडे येत असून, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
...................
कोट
घंटागाडी खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला. टेम्पल गार्डन, तसेच नाट्यगृहाच्या कामाची चौकशी केली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल.
- प्रकाश राऊत, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वाशिम.