सुकांडा शिवारातील वीजतारांची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:30+5:302021-08-22T04:44:30+5:30
राजुरा : येथून जवळच असलेल्या सुकांडा शेतशिवारात विजेच्या मुख्य प्रवाहाचे खांब झुकून तारा लोंबकळल्या होत्या. तारांतील वीज प्रवाहाच्या धक्क्याने ...

सुकांडा शिवारातील वीजतारांची दुरुस्ती
राजुरा : येथून जवळच असलेल्या सुकांडा शेतशिवारात विजेच्या मुख्य प्रवाहाचे खांब झुकून तारा लोंबकळल्या होत्या. तारांतील वीज प्रवाहाच्या धक्क्याने चार रोहींचा मृत्यू झाल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘दै. लोकमत’ने प्रकाशित केले. त्यानंतर, खडबडून जागे झालेल्या महावितरणने दखल घेत, झुकलेल्या वीज खांबासह लोंबकळलेल्या तारांची १९ ऑगस्ट रोजी दुरुस्ती केली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
मेडशी वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुकांडा शिवारातील शेतकरी पांडुरंग घुगे यांच्या शेतानजीक विजेच्या लोंबकळलेल्या तारांखाली सापडून चार रोहींचा मृत्यू झाला. ही घटना महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळेच घडली. घटनास्थळाहून गेलेल्या वीज वाहिनीचे दोन खांब झुकून तारा लोंबकळल्या होत्या. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे वेळोवेळी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच निष्पाप रोहींना जीव गमवावा लागला, असे मत माजी पंचायत समिती सदस्य उल्हासराव घुगे यांनी व्यक्त केले. यासंबंधी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच, तत्काळ दखल घेऊन महावितरणने झुकलेल्या वीजखांबासह लोंबकळलेल्या तारांची दुरुस्ती केली.
....................
दोषींविरुद्ध गुन्हे दाखल
या प्रकरणी मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांसह एका कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध वन कायद्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, पुढे काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.