देवाळय़ाची रेणुकामाता
By Admin | Updated: September 27, 2014 23:45 IST2014-09-27T23:45:04+5:302014-09-27T23:45:04+5:30
भाविकांचे श्रद्धास्थान

देवाळय़ाची रेणुकामाता
वाशिम :साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या माहुरगडच्या रेणुकामातेची प्रतिकृती असलेल्या वाशिम - देवाळा संस्थानवर रेणुकामातेच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची रिघ असते. सुरकंडी या गावाशेजारी निसर्गाने नटलेल्या नयनरम्य परिसरात देवाळा संस्थान वसले आहे. मंदिर परिसरातून व त्सगुल्म नावाची नदी वाहते. त्यामुळे संस्थानच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.
वत्सगुल्म नदीच्या तीरावर रेणुकामाता वसल्याची आख्यायिका असल्यामुळे परिसरात दोन ठिकाणी मातेची मंदिरे उभारण्यात आली आहेत.
या संस्थानची एक आख्यायिका सांगितली जाते. अंदाजे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी वाशिम शहरा तील नारायणराव पाटील चळक हे माहुरगडच्या रेणुका मातेचे भक्त होते. ते नेहमी मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुरला जात असत. वृद्धापकाळामुळे नंतर त्यांना पायदळ वारी करणे कठीण झाले. अशा स्थितीत एकेदिवशी ते माहुरला गेले असता मातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हणाली की ह्यआता तुला माझ्या दर्शनासाठी पायदळ येण्याची आवश्यकता नाही. मी आता तुझ्या देव्हार्यात येवून राहणार आहे.ह्ण या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माता येथे आली, अशी आख्यायिका आहे. यानंतर नारायणरावांनी त्या ठिकाणी मातेचे छोटेसे मंदिर बांधले. यानंतर मातेच्या श्रद्धेने प्रभावित असलेल्या वाशिममधील देवबा केंदळे यांनी नदीच्या पश्चिमेकडील तिरावर भव्य मंदिर उभारले.तेव्हापासून दरवर्षी नवरात्रामध्ये नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरविली जाते.