ग्रा.पं.ची ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी
By Admin | Updated: May 28, 2014 23:36 IST2014-05-28T23:10:27+5:302014-05-28T23:36:17+5:30
ग्रामपंचायचे ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी झाली आहे.

ग्रा.पं.ची ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी
लोहगाव महागाव : येथील नागरिक कर भरण्यास पुढे येत नसल्याने ग्रामपंचायचे ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी झाली आहे. करवसूली होत नसल्याने गावातील विकासकामे ठप्प पडली आहे. गावाचा विकास गावातूनच व्हावा, या उद्देशाने शासनाने स्वतंत्र ग्रामपंचायतीचे निर्माण केले. तेथील नागरिकांच्या विकास व गावातील नागरिकांच्या समस्या गावपातळीवर सुटावी यासाठी गावात लोकसंख्येप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाची स्थापना झाली. ग्रामपंचायत मार्फत गावातील नागरिकांना विविध सोयी पुरविल्या जातात. ज्यामध्ये नळयोजना, पाणीपुरवठा, पथदिवे, आरोग्य चांगले राहावी यासाठी विहिरीत ब्लिचिंग पावडरे टाकणे अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या मुलभूत सुविधा ग्रामस्थांना देत असताना ग्रामपंचायत कर आकारणी करीत असते. मात्र मागील अनेक दिवसांपासून स्थानिक ग्रामपंचायतीचे करापोटी नागरिकांकडे लाखो रूपये थकीत आहे. घर कर, पाणी कर, दिवा कर, आरोग्य कर आदीची वसूली होत नसल्याने गावातील विकासकामे ठप्प पडली आहे. गावात पाणी पुरवठा सुरळीत नाही, पथदिवे बंद आहेत. विहिरीजवळ घाण साचली आहे. सचिवांनी ग्रामस्थांना कर भरण्याबाबत वारंवार ताकीद दिली आहे तरीही नागरिक कर भरीत नसल्याने ग्रा.पं.च्या तिजोरीत ठणठणाट झाला आहे.