परतीच्या पावसाने बळीराजाला दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:35 IST2017-09-13T01:35:55+5:302017-09-13T01:35:55+5:30
वाशिम: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) लवकरच परतीचा मार्ग धरणार असताना सोमवारी जिल्ह्यात पावसाने बर्यापैकी हजेरी लावली. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मानोरा तालुका वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी मिळून १0५ मिमी पावसाची नोंद झाली.

परतीच्या पावसाने बळीराजाला दिलासा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) लवकरच परतीचा मार्ग धरणार असताना सोमवारी जिल्ह्यात पावसाने बर्यापैकी हजेरी लावली. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मानोरा तालुका वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी मिळून १0५ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. यंदा ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून, त्यामध्ये पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीन, तर ५३ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे, तर ३0 हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. त्याशिवाय मूग, उडीद आणि ज्वारीच्या पिकाचाही बर्यापैकी पेरा यंदा करण्यात आला आहे. तथापि, यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना मोठा फटका बसला असून, उडीद आणि मुगाच्या उत्पादनात घट आल्यानंतर सोयाबीनचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात घटण्याची भीती निर्माण झाली. त्यातच दीर्घ कालावधीची पिके असलेली तूर आणि कपाशी पूर्णपणे बुडण्याचीच भीती असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अशात सोमवारी दुपारपासून जिल्ह्यातील मानोरा तालुका वगळता पावसाने सर्वच तालुक्यात हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड या तीन तालुक्यात हा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात याच दिवशी १0५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पिकांना विशेष करून शेंगावर असलेले हिरव्या सोयाबीनसह तूर आणि कपाशीच्या पिकाला मोठा आधार मिळाला आहे. परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाच्या आगमनामुळे शेतकर्यांची चिंता थोडीफार दूर झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात होता; मात्र पाऊस पडला नाही.
मानोरा तालुका कोरडाच!
सोमवारी सायंक ाळपासून वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी, मानोरा तालुक्यात मात्र पावसाचा एकही थेंब पडला नाही. या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात, तूर कपाशी आणि सोयाबीनची पेरणी झालेली असून, ही पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत. सोयाबीन, तर पूर्णपणे हातून गेल्यात जमा आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातही केवळ ३ मिमी पावसाची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.
सरासरीच्या तुलनेत प्रमाण कमीच!
सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३७ मिमी पाऊस रिसोड तालुक्यात, त्या खालोखाल ३५ मिमी कारंजा तालुक्यात, मंगरुळपीर तालुक्यात २0 मिमी आणि वाशिम तालुक्यात १0 मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, या पावसानंतरही १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात केवळ ६४.९९ टक्केच पाऊस पडला असून, प्रकल्पातील पाणी पातळीवर या पावसाचा काहीच परिणाम झालेला नाही.