४९ कोटींची महसूल वसुली!
By Admin | Updated: April 10, 2016 01:33 IST2016-04-10T01:33:27+5:302016-04-10T01:33:27+5:30
वाशिम अमरावती विभागात अव्वल; निर्धारित उद्दिष्टापेक्षा आठ टक्के अधिक.

४९ कोटींची महसूल वसुली!
दादाराव गायकवाड / कारंजा लाड
राज्य शासनाने सन २0१५- १६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला ४८ कोटी ९३ लाख वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. या उदिष्टापेक्षा आठ टक्के अधिक वसुली वाशिम जिल्ह्याने केली असून, महसूल वसुलीत अमरावती विभागात जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
शासनाने सन २0१५-१६ वर्षासाठी अमरावती महसूल विभागाला महसूल वसुलीचे ३८७ कोटी ९३ लाखाचे उद्दिष्ट दिले होते, त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल वसुलीची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्याने निर्धारित ३१ मार्चच्या मुदतीपर्यंत ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या आठ टक्के अधिक वसुली केल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
शासनाकडून महसूल विभागाला दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. महसुली वसुलीमध्ये जमीन महसूल, करमणूक कर, गौण खनिज, या लेखा शीर्षकाखाली कर वसूल करण्यात येते. वाशिम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाधिक महसूल वसुलीच्या सूचना सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील प्रशासनाला दिल्या होत्या. राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकार्यांनी महसूल वसुली संदर्भात विभागातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकार्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत वसुलीबाबत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना केल्या होत्या.