दुष्काळी स्थितीत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन
By Admin | Updated: May 12, 2015 01:15 IST2015-05-12T01:15:44+5:302015-05-12T01:15:44+5:30
दिवसाकाठी साडेचार लाख; इंझोरीच्या १५ शेतक-यांचा स्तुत्य प्रयोग.

दुष्काळी स्थितीत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन
नरेश आसावा/ मानोरा: तालुक्यातील १५ शेतकर्यांनी दुष्काळी स्थितीतही अभिनव पद्धतीने शेती करताना जवळपास २0 एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. हे १५ शेतकरी मिळून दरदिवशी अकराशे कॅरेट टोमॅटोची तोडणी करून त्याच्या विक्रीतून साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत. गतवर्षी एवढय़ाच क्षेत्रातून या शेतकर्यांनी मिळून जवळपास ६0 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. यंदाच्या उत्पादनाचे प्रमाण पाहता या शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीपेक्षा अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट दिसते.
गत तीन वर्षांपासून राज्यभरातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटांमुळे गलितगात्र झाले असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील १५ शेतकर्यांनी नैसर्गिक संकटांपुढे हार न पत्करता अभिनव पद्धतीने शेती करून लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. हे शेतकरी गतवर्षीपासून एकत्रितपणे टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. अडाण नदीच्या पात्रानजीक शेती असलेल्या या शेतकर्यांनी गतवर्षीपासून एकमेकांच्या सल्ल्यानुसार केलेला टोमॅटोच्या लागवडीचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. या प्रयोगातून प्रत्येक शेतकर्याला जेमतेम सव्वा ते दीड एकर क्षेत्रात गतवर्षी अडीच ते पावणे तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले. या शेतकर्यांनी टोमॅटोची लागवड करण्यासाठी दज्रेदार संकरित बियाण्याची निवड केली, तसेच मालाची विक्री करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने बाजाराची निवड केली. टोमॅटोची लागवड करण्याच्या पद्धती आणि प्रक्रियेनुसार जमिनीचा आलटून पालटून वापर करावा लागत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. या १५ शेतकर्यांनी त्या पद्धतीनुसार गतवर्षीचे क्षेत्र सोडून उर्वरित सव्वा ते दीड एकरात पुन्हा टोमॅटोची लागवड केली.