हजारो धनगर समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: August 5, 2014 20:13 IST2014-08-05T00:29:22+5:302014-08-05T20:13:53+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो समाजबांधवांचा मोर्चा धडकला.

हजारो धनगर समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरित लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सोमवार ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो समाजबांधवांचा मोर्चा धडकला. सन १९५६ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक ३६ वर ओरॉन, धनगर असा ४४२ क्रमांक दिलेला असून त्यांचा व्यवसाय शेळया, मेंढया चारणारी व जंगल वनामध्ये राहणारी जमात असे निर्देश दिलेले असतांना मागील ५८ वर्षांंपासून ही जमात आरक्षणापासून वंचित आहे. गेली ५८ वर्षांपासून केंद्रशासनाकडून या जमातीच्या विकासासाठी दरवर्षी निधी येतो परंतु या जमातीच्या एकाही व्यकितला लाभ मिळत नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून धनगर जमातीला ताबडतोब प्रमाणपत्र देणे व अनुसूचित जमातीला मिळणारे लाभ देण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचला तेव्हा जिल्हाधिकारी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी अनंतकुमार पाटील, किसनराव मस्के, नारायण बोबडे, नारायण लांभाडे, बालू मुरकूटे, गजानन खटके, बबनराव मिटकरी, डॉ. गजानन ढवळे, डॉ. गजानन हुले, नंदु गोरे, सुरेश मुखमाले, रविभाऊ लांभाडे, दिपक तिरके, केशव गावंडे, संतोष मस्के, अजय पाटील, डॉ. विश्वासराव मेटकर आदींसह हजारो बाधंवांची उपस्थिती होती.