पावसाचा मुक्काम वाढला

By Admin | Updated: September 1, 2014 00:43 IST2014-09-01T00:35:42+5:302014-09-01T00:43:28+5:30

वाशिम जिल्हय़ात सलग तिसर्‍या दिवशीही पाऊस : पिकांना संजीवणी, जलपातळीत होतेय वाढ.

Rainy stay increased | पावसाचा मुक्काम वाढला

पावसाचा मुक्काम वाढला

वाशिम : यंदा दोन महिने उसंत घेणारा पाऊस या आठवड्यात जिल्हावासीयांवर चांगलाच मेहेरबान झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून विविध ठिकाणी बरसणार्‍या पावसाने जिल्हय़ातील मुक्काम वाढविला आहे. या पावसाचा पिकांना फायदा होण्याबरोबरच जलपातळीत वाढ होणार आहे.
गत वर्षी सतत बरसून शेतकर्‍यांना अडचणीत आणणार्‍या पावसाने यंदा मात्र चांगलीच उसंत घेतली होती. मृग, रोहिणी या नक्षत्रात नावापुरताच पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. मृगाच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांनी वेळेवरच पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जून, जुलै या दोन महिने कोरडेच गेल्यानंतर ऑगष्ट महिना अर्धा उलटत आला तरी, पावसाची सरासरी अध्र्यापर्यंंत आली नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा घसा कोरडा पडू लागला होता. जिल्हय़ातील १0८ गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. शासनाने कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या राज्यभरातील तालुक्यांत वाशिम जिल्हय़ातील वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या चार तालुक्यांचा समावेश होता. पावसाअभावी पिके सुकू लागली, तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करू लागला असताना या आठवड्यात जिल्हाभरात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. शुक्रवारपासून बरसणार्‍या पावसामुळे जनजीवन प्रभावित होत असले तरी, या पावसामुळे पिकांना चांगलाच आधार मिळाला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या थोडीफार कमी झाली आहे. जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होणार आहे.
अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्रातील किनारी भागातील केरळपर्यंंत, तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड परिसरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यासह विदर्भातील काही भगांत पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले, येत्या दोन दिवसांत जिल्हय़ात जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
* गत तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा फायदा सोयाबीन, कपाशी, तूर, या पिकांना होणार असून, जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होणार आहे. या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जिल्हय़ातील जलसाठय़ात काही प्रमाणात वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याची समस्या थोडीफार कमी होण्याची शक्यता आहे. रिपरिप पावसामुळे पिकांवर रोगराईचे संकट वाढणार असल्याचेही बोलल्या जात आहे.

Web Title: Rainy stay increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.