पावसाने पिकांना मिळाली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST2021-08-22T04:43:39+5:302021-08-22T04:43:39+5:30
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसाने पिकास संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून ...

पावसाने पिकांना मिळाली संजीवनी
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसाने पिकास संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीपिके प्रभावित झाली होती. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही विजेचा खोळंबा येत पावसाअभावी सोयाबीन पीक पूर्णत: वाया जाणार असल्याचे दिसत होते. कापूस व सोयाबीन पिकांवर विविध कीड व अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागात महाग कीटकनाशकाची फवारणी करून, पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच, पावसाने दडी मारल्याने मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला होता. गेल्या दोन, तीन दिवसांपासून तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्याने पिकास संजीवनी मिळाली आहे, तसेच अनेक सिंचन प्रकल्पातही पावसामुळे जलसाठा वाढला आहे.
.................
मानाेरा तालुक्यात शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
मानोरा : तालुक्यात फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला मागील दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस कमी-अधिक प्रमाणात बरसत असल्याने जीवनदान मिळाले आहे. त्रेपन्न हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांत सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सोयाबीन या पिकाला मागील पंधरा दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्याने फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीन पीक अनेक ठिकाणी कोमेजले होते. मानोरा तालुक्यात खरीप हंगामात पेरण्यात आलेल्या एकूण बियाण्यापैकी ३१ हजार हेक्टरच्या जवळपास सोयाबीन या पिकाच्या बियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. मागील पंधरवड्यातील अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झालेले असल्याने सोयाबीन आणि इतरही पिके आता बहरात आहे. निसर्गाने साथ दिल्यास मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी सोयाबीनचे विक्रमी पीक तालुक्यात होण्याची आस शेतकरी लावून बसलेले आहेत. तालुक्यातील डौलाने उभे असलेल्या आणि चांगली वाढ झालेल्या सोयाबीनच्या पिकावर काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाल्याने कीड नाशकांची फवारणी शेतकऱ्यांनाद्वारा करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिवाळीपश्चात सोयाबीनच्या किमती गगनाला भिडल्याने शेत शिवारात डौलाने उभ्या असलेल्या सोयाबीनमुळे या वर्षी चांगले उत्पन्न होण्याचे हिरवी स्वप्ने तालुक्यातील शेतकरी बांधवांना आतापासून पडत आहेत.