जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:09+5:302021-07-30T04:43:09+5:30
पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जूनच्या अखेरपासून १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस पावसाने धडका सुरू ...

जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी
पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जूनच्या अखेरपासून १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस पावसाने धडका सुरू केला. अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, जमिनी खरडून गेल्या. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. गत पाच दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासह तण व्यवस्थापनाला वेग दिला. पिके चांगली सुधारली असतानाच बुधवार २८ जुलै रोजी दुपारपासून पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. गुरुवारी ही जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे पिके संकटात सापडण्याची भीती असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
------------
कीड नियंत्रण, तण व्यवस्थापनात खोडा
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पिकांत तण वाढले आहे, तर किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाचे काम करीत आहेत ; परंतु बुधवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने या कामात आता खोडा निर्माण झाला असून, वेळेत ही कामे न केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
-----------
नुकसानाच्या सर्वेक्षणात अडचणी
गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांना फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पिकांसह खरडून गेल्या. संबंधित शेतकऱ्यांनी या संदर्भात पीक विमा कंपनीसह प्रशासनाकडे तक्रारी करीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या अर्जानुसार पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन पंचनाम्यात गुंतले असताना आता पावसामुळे त्यात अडचणी येत आहेत.
---------
पावसाने ओलांडली सरासरी
जिल्ह्यात १ जून ते २९ जुलै दरम्यान ३९४.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो, प्रत्यक्षात याच कालावधीत जिल्ह्यात ५३२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अर्थात आवश्यक सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात पडला आहे. पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडल्याने जलस्त्रोतांची पातळी वाढली असली तरी सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्याने ही पिकांना धोका आहे.
-----------
कोट : आधी १५ ते २० दिवस दडी मारणाऱ्या पावसाने आता त्रस्त केले आहे. अवघे चारच दिवस उघडीप मिळाल्यानंतर पावसाने बुधवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे विविध कामांत खोडा निर्माण झाला असून, अतिपावसामुळे पिके संकटात सापडण्याची भीती आहे.
-नितीन पाटील उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर
------
कोट : पावसाचे प्रमाण सद्यस्थितीत चांगले आहे ; परंतु बुधवारपासून पुन्हा हजेरी लावणाऱ्या पावसाचा मुक्काम वाढल्यास पिके संकटात सापडण्याची भीती आहे. शिवाय पावसामुळे पीक व्यवस्थापनाच्या कामात ही सतत खोडा निर्माण होत आहे.
-घनशाम ढोक,
शेतकरी, इंझोरी