रा.काँ. जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
By Admin | Updated: October 14, 2014 01:51 IST2014-10-14T01:51:20+5:302014-10-14T01:51:20+5:30
वाशिम रा.काँ. जिल्हाध्यक्षाचा राजीनामा इतरही काही पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र.

रा.काँ. जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य काही पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पक्षाची उमेदवारी देताना विश्वासात घेतला नसल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून कोणत्याही प्रक्रियेत आपणास विश्वासात घेतले नसल्याचे जिल्हाध्यक्ष राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. उमेदवारांच्या जाहिरातींमध्ये जबाबदार पदाधिकार्यांना डावलण्यात आले. ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा व प्रचार सभांचे निमंत्रणही दिले नाही, असेही राजीनामा देणार्या पदाधिकार्यांनी म्हटले आहे. या प्रसिद्धीपत्रकावर वाशिम तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, शहराध्यक्ष राजु रंगभाळ, निवासी जिल्हाध्यक्ष राजू लाहोटी, युवक जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद वर्मा, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष साहेबराव सुर्वे, मानोरा तालुकाध्यक्ष काशीराम राठोड, कारंजा तालुकाध्यक्ष सुभाष ढाणे पाटील, एस.टी. कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष नागोराव ठेंगडे, नंदलाल जाखोटिया, व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष राजू चरखा, रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष गिरीश सारडा, दिनेश बदलानी, राकाँ विद्यार्थी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर माळेकर आदी पदाधिकार्यांच्या सह्या आहेत. यासंदर्भात सुभाष राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगून, सदर राजीनामे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या प्रसिद्धी पत्रकावर सह्या करणार्या पदाधिकार्यांनीही राजीनामे दिलेत का, या प्रश्नांची उत्तरं मिळू शकली नाही.