अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST2021-09-23T04:48:12+5:302021-09-23T04:48:12+5:30
............... जलपुनर्भरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने कूपनलिकांमध्ये सोडण्यासाठी जलपुनर्भरणाकडे विशेष लक्ष द्यावे, अशा ...

अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
...............
जलपुनर्भरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने कूपनलिकांमध्ये सोडण्यासाठी जलपुनर्भरणाकडे विशेष लक्ष द्यावे, अशा शासनाच्या सूचना आहेत; मात्र चालूवर्षी अधूनमधून जोरदार पाऊस होत असतानाही जलपुनर्भरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांमधूनही याकामी उदासीनता बाळगली जात आहे.
.................
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्र नामशेष
वाशिम : जिल्ह्यात साधारणत: १० वर्षांपूर्वी चार ठिकाणी वीज अटकाव यंत्र कार्यान्वित करण्यात आले होते. कालांतराने ते नादुरुस्त झाले. प्रशासकीय यंत्रणेने यंत्र दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने ते आजमितीस नामशेष झाले आहेत. चालूवर्षीच्या पावसाळ्यातही आकाशातून चकाकत येणारी वीज जमिनीवर पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
................
मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत
वाशिम : पाटणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या मुख्य मार्गावर वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. फळविक्रेत्यांच्या गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या राहत असल्याने हा प्रकार घडत आहे. शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष पुरवून समस्या निकाली काढावी, अशी मागणी जोर धरत आहे.
.............
नागरिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन
वाशिम : आगामी काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. अंदाज खरा ठरल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या धुवाधार पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
...............
लसीकरण मोहिमेस नगण्य प्रतिसाद
वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाने बाधित व्यक्तींचा आकडा घटला आहे. यामुळे कोरोनाची भीती नाहीशी झाल्यागत स्थिती निर्माण झाली असून, लसीकरण मोहिमेलाही यामुळे नगण्य प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर दैनंदिन तुरळक गर्दी राहत असल्याचे दिसून येत आहे.
.............
तुंबलेल्या नाल्यांची न. प. कडून सफाई
वाशिम : धुवाधार पाऊस झाल्यास अडचण उद्भवू नये, यासाठी स्थानिक नगर परिषदेने प्रथम प्राधान्याने तुंबलेल्या नाल्यांची सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वच्छता कर्मचारी या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. शहरातून दैनंदिन कचरा संकलनासोबतच सफाईच्या कामांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.