वकिलास झालेल्या मारहाणीचा जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:10+5:302021-05-30T04:31:10+5:30

वाशिम : मालेगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ सुदर्शन गायकवाड यांना पोलिसांकरवी झालेल्या मारहाणीचा वाशिम जिल्हा विधिज्ञ मंडळाने तीव्र निषेध ...

Protest on behalf of the District Bar Association against the beating of a lawyer | वकिलास झालेल्या मारहाणीचा जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने निषेध

वकिलास झालेल्या मारहाणीचा जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने निषेध

वाशिम : मालेगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ सुदर्शन गायकवाड यांना पोलिसांकरवी झालेल्या मारहाणीचा वाशिम जिल्हा विधिज्ञ मंडळाने तीव्र निषेध नोंदविला असून या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षा अ‍ॅड. छाया मवाळ व सचिव अ‍ॅड. नामदेव जुमडे यांच्या नेतृत्वाखाली २४ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, बार कौन्सिलचे राज्यातील पदाधिकारी तथा विरोधी पक्षनेत्यांना निवेदने पाठविण्यात आली. निवेदनावर जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील असंख्य वकील मंडळींच्या सह्या आहेत.

निवेदनात नमूद केले आहे की, ज्येष्ठ विधिज्ञ सुदर्शन गायकवाड यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात २४ मे रोजी जिल्हा विधिज्ञ मंडळाची तातडीची बैठक बोलावून चर्चा करण्यात आली व एकमताने निषेधाचा ठराव पारित करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या ताफ्याला ओव्हरटेक केल्यामुळे साथरोगाचे कारण दाखवून मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनुने व इतर आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरून अ‍ॅड. सुदर्शन गायकवाड यांच्या घरात जाऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांंना अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्र. २०३/२०११ अन्वये भादंवि कलम ३५३, ३३२, १८६, २९४, ५०४, १८८, २६९, २७० व ३४ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ नुसार त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचा स्वत:चा दिलेला रिपोर्ट अधिकाऱ्यांनी फाडून फेकून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा वाशिम जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे. घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेचा तपास हा सीबीआयकडे किंवा पोलीस महानिरीक्षक यांच्यामार्फत समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Web Title: Protest on behalf of the District Bar Association against the beating of a lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.