पाऊस लांबल्यास चारा डेपोंचा प्रस्ताव
By Admin | Updated: July 13, 2014 00:54 IST2014-07-13T00:54:05+5:302014-07-13T00:54:05+5:30
आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास जुलैनंतर जिल्हा परिषद संर्कलनिहाय ५३ चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव

पाऊस लांबल्यास चारा डेपोंचा प्रस्ताव
अकोला: जिल्ह्यातील पशुधनासाठी जुलैअखेर पुरेल एवढा चारा सध्या उपलब्ध आहे; आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास जुलैनंतर जिल्हा परिषद संर्कलनिहाय ५३ चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, खरीप पेरण्या खोळंबल्या असून, जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत आणखी काही दिवसात सार्वत्रिक पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पाणी आणि चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. लहान-मोठय़ा जनावरांसह जिल्ह्यात एकूण २ लाख ७७ हजार ८८१ पशुधनाची संख्या आहे. या जनावरांसाठी जुलै महिना अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा सध्या जिल्ह्यात उपलब्ध आहे. परंतु, येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येत्या ऑगस्टमध्ये चारा डेपो सुरू करावे लागतील. त्यानुषंगाने जिल्ह्यात जिल्हा परिषद सर्कलनिहाय ५३ चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.