प्रचार तोफा अजूनही बारूदीविनाच!
By Admin | Updated: October 3, 2014 00:35 IST2014-10-03T00:35:55+5:302014-10-03T00:35:55+5:30
अद्याप वाशिमसह कारंजालाड येथील निवडणुक प्रचारसभा प्रभावहीन.

प्रचार तोफा अजूनही बारूदीविनाच!
दिवाकर इंगोले /कारंजा(वाशिम)
विधानसभा निवडणूक पंधरा दिवसांवर आली तरी, कोणत्याही पक्षाने आपल्या निवडणूक तोफात पुरेशी बारूद भरलीच नाही. त्यामुळे प्रचारयात्रा फार प्रभावी झाली नाही. तथापि, उमेदवार व कार्यकर्त्यांचे प्रचार दौरे मात्र सुरू झाले. अद्याप चिन्ह वितरित झाले नाही. सध्या महाराष्ट्रात युती व आघाडी तुटल्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आजपर्यंत परस्परांच्या सहकार्याने प्रचार करणारे कार्यकर्ते आता परस्परांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत; परंतु त्यांची अद्यापही तशी मानसिकता तयार व्हायची आहे.
युतीतील मित्रपक्ष आता शत्रू पक्ष म्हणून परस्पराशी स्पर्धा करणारा व आपल्या पक्षाला सरस ठरविणारा निर्णायक प्रचार अद्याप सुरू झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांची आघाडी बिघाडी झाल्यामुळे उमेदवाराचा मिळून प्रचार करणारे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहे.
पूर्वी मित्र असलेल्यांना आपल्याच मित्राच्या विरुद्ध गरळ ओकावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या कारंजा मतदारसंघात बहुरंगी लढाई होणार असल्याचे दिसून येत आहे. ही संपूर्ण लढाई अगदी लक्षवेधी ठरणार आहे. महाभारतासारखे आपल्याच नातेवाइकांशी प्रचारयुद्ध पुकारायचे आहे. ग्रामीण भागात प्रचार सभेशिवाय अद्याप कारंजा शहरात गर्दीला अर्थ देणारी कोणतीही भव्य प्रचार सभा झाली नाही. यावर्षी ही निवडणूक बहुरंगी ठरणार आहे. थोड्याफार फरकाने उमेदवाराचा विजय होईल. कारंजा श्हराची हवा अद्याप कोणत्याही उमेदवाराला हात देण्याएवढी स्थिती दर्शविणारी नाही. सध्या सर्वच आघाड्यांवर सामसूम आहे.