पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथे!
By Admin | Updated: April 18, 2017 01:19 IST2017-04-18T01:19:38+5:302017-04-18T01:19:38+5:30
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत.

पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथे!
११५० कोटींचे उद्दिष्ट : वाटप झाले १०९ कोटी
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत. त्यातही सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असून, उर्वरित राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाला शुक्रवार, ७ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळल्यास इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत फारसा उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळेच पीक कर्ज वाटपाचा आकडा धिम्यागतीने पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना सर्व बँका मिळून एकंदरित ११५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ११ दिवस उलटल्यानंतर त्यातील केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले असून १४ हजार १०८ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे, असे असले तरी उर्वरित १०४१ कोटी रुपये अद्याप वाटप करावे लागणार आहेत. त्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, कुठल्याही स्थितीत ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पार पाडली जावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत.
गतवर्षी १ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी घेतले होते ८२३.४२ लाखांचे पीक कर्ज!
सन २०१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून ८२३.४२ कोटींचे पीक कर्ज काढले होते. पीक कर्ज वितरणात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६१ हजार ६४२ शेतकऱ्यांना ३६८ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज दिले होते. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३० हजार ६६ शेतकऱ्यांना ३०५ कोटी ४ लाख, खासगी बँकांनी १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २५ कोटी ११ लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १० हजार ८४२ शेतकऱ्यांना १११ कोटी ५४ लाख रुपये पीक कर्ज वितरीत केले होते. त्या तुलनेत यंदा पीक कर्ज वाटपाची सुरूवात निराशाजनक राहिली आहे.
पीक कर्ज वाटपाचा आलेख उंचावण्याकरिता जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्यासमवेत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक व्ही.एच.नगराळे यांनी तालुकास्तरावर बैठका घेणे सुरू केले असून, सोमवारी कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यातील बँक प्रतिनिधींची बैठक पार पडली. पीककर्जाची मागणी करणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्च एन्डींगमुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांवर कामाचा अतिरिक्त ताण होता. अशातच काही बँकांचे ‘आॅडिट’ देखील सुरू होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची गती मंदावली होती. आता मात्र पूर्ण दिमतीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कर्जवाटपाचा आकडा निश्चितपणे वाढणार आहे.
- व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम