‘नाफेड’च्या बारदाणा तुटवड्याचा प्रश्न कायम!
By Admin | Updated: April 20, 2017 02:05 IST2017-04-20T02:05:00+5:302017-04-20T02:05:00+5:30
शेतकऱ्यांचे हाल : रिसोड येथे नाफेडची खरेदी बंद

‘नाफेड’च्या बारदाणा तुटवड्याचा प्रश्न कायम!
रिसोड : पूर्वी साठवणुकीच्या अडचणीमुळे वांध्यात अडकलेली नाफेडची तूर खरेदी आता बारदाण्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. मागील १८ दिवसांपासून बंद असलेली नाफेडची खरेदी अद्यापही सुरू होऊ शकली नाही.
वाशिम जिल्ह्यात यंदा तुरीच्या पेऱ्यात वाढ झाली आणि उत्पादनही बऱ्यापैकी झाले. त्यामुळे बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. तथापि, बाजारात हमीदराहून कमी दराने व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी निराश असताना नाफेडने खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला खरा; परंतुु आठ आठ दिवस बाजारात थांबूनही नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी होत नव्हती. त्यातच साठवणुकीसाठी जागा नसल्याने फेब्रुवारी महिन्यात काही दिवस खरेदी थांबली.
वखार महामंडळाची गोदामे भरली आणि खासगी गोदामे भाड्याने मिळत नसल्याने मध्यंतरी खरेदी बंद होती. त्यानंतर पुन्हा खरेदी सुरू झाली. मात्र, बारदाणा उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून २ एप्रिलपासून खरेदी बंद आहे. १५ एप्रिल अंतिम मुदत संपल्यानंतर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सात दिवसांची मुदतवाढ घोषित केली होती. मात्र, त्याउपरही येथील नाफेड खरेदी सुरू होऊ शकली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात तुरीची विक्री करण्याची वेळ आली आहे.
रिसोड तालुुक्यात खरेदी-विक्री संघामार्फत १ एप्रिलपर्यंत २६७६ शेतकऱ्यांची ३१ हजार क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली होती; मात्र त्यानंतर नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तथापि, नाफेडने बारदाणाचा प्रश्न तत्काळ निकाली काढून तूर खरेदी पूर्ववत करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.