कृषी विकासाच्या योजना राबविण्यास प्राधान्य
By Admin | Updated: May 1, 2017 13:46 IST2017-05-01T13:46:14+5:302017-05-01T13:46:14+5:30
पालकमंत्री राठोड - महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

कृषी विकासाच्या योजना राबविण्यास प्राधान्य
वाशिम : राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याकरिता कृषी विकासासाठी योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत असून जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. राठोड म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात सुमारे ६ हजार कामे पूर्ण झाली. त्यामुळे ३७ हजार ८६७ टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. याद्वारे ३५ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात ६७४ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. धडक सिंचन विहीर योजनेतून जिल्ह्यात ५ हजार ९०० विहिरींचे काम पूर्ण झाले असून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६ हजार विहिरी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी २ हजार ७५० विहिरींचे काम सुरु आहे, असे राठोड म्हणाले.
प्रारंभी पालकमंत्री ना. राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक देविदास इंगळे व राखीव पोलीस उपनिरीक्षक सुनील बोरकुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परेड संचलन केले. यामध्ये श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, आरोग्य विभागाचा उष्माघात विषयी जनजागृती करणारा चित्ररथ व रुग्णवाहिका, जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत अभियान विषयक रथाचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी केले.