‘हाताला काम, मालाला दाम’ देण्याला प्रथम प्राधान्य
By Admin | Updated: February 29, 2016 02:19 IST2016-02-29T02:19:39+5:302016-02-29T02:19:39+5:30
रणजित पाटील यांचे प्रतिपादन.

‘हाताला काम, मालाला दाम’ देण्याला प्रथम प्राधान्य
रिसोड (जि. वाशिम): बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासोबतच शेतकर्यांच्या मालाला योग्य दाम देण्याला शासन प्राधान्यक्रम देणार आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे, तसेच पाणी व वीज मूलभूत गरजा एका वर्षात सोडविण्यावर विशेष भर असणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. स्थानिक पंचायत समिती सभागृहात शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते राजू पाटील राजे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अँड. विजय जाधव, शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष अँड. किरण सरनाईक, जि.प. कृषी सभापती सुभाष शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण सानप, जि. प. सदस्य शंकर बोरकर, पं.स. सभापती छाया पाटील, पं.स. उपसभापती महादेव ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विठ्ठल आरु, डॉ.दिलीप धोपे, व्यापारी मदन बगडीया, डॉ.दीपक सानप, देवीदास नागरे, मांगुळ झनक सरपंच माधुरी झनक, डॉ. विजयप्रसाद तिवारी, डॉ. मदन नरवाडे, विनोद जोशी, रवींद्र मोरे यांची उपस्थिती होती. डॉ. रणजित पाटील म्हणाले की, आज मराठी भाषा बोलताना मराठी कवी म्हणतात, देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे.. एवढं प्रेम भरभरुन दिले. बळं दिले असे म्हणायला वावगे ठरणार नाही. जिल्हय़ाला दंत चिकित्सा महाविद्यालय, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य कार्ड, शेतकर्यांसाठी वीज व पाणी या मूलभूत समस्या सोडविण्याचा माझा मानस आहे. एका वर्षातील प्रलंबित कृषीपंप जोडणी आता पुर्णत्वास नेण्यात येईल, पैनगंगा बॅरेजेसचा प्रश्न हाती घेतला आहे. तसेच शालेय पोषण आहाराच्या कटकटीतून मुख्याध्यापकांना बाहेर आणण्याचा प्रयत्न आहे. रिसोड येथील उद्योजक मन्नालाल अग्रवाल यांनी उद्योजकांमध्ये भरीव काम केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सत्कार केला आहे, हे सांगण्यास माझी छाती फुगून गेली आहे, मला अभिमान वाटला, असे डॉ.पाटील यांनी मनोगतामध्ये आवर्जून सांगितले. प्रास्ताविक जयंत वसमतकर यांनी तर संचालन मुख्याध्यापक सज्जन बाजड यांनी केले. आभार सुनील पाटील यांनी मानले.