पंतप्रधानांच्या भाषणासाठी टिव्हींची उसनवारी
By Admin | Updated: September 4, 2014 23:07 IST2014-09-04T23:07:19+5:302014-09-04T23:07:19+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या ७७४ पैकी केवळ १५९ शाळांमध्ये संगणक; सुविधांचाअभाव प्रमुख अडचण.

पंतप्रधानांच्या भाषणासाठी टिव्हींची उसनवारी
संतोष वानखडे / वाशिम
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनाचे औचित्य साधत ५ सप्टेंबर रोजी देशभरातील शाळांमध्ये दूरचित्रवाणी (टिव्ही), रेडीओ किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंंशी संवाद साधणार आहे. मात्र, या संवादात शाळांतील सुविधांचा अभाव ही प्रमुख अडचण ठरणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील जवळपास ७५ टक्के शाळांमध्ये दूरचित्रवाणीची व्यवस्थाच नसल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे गावातून रेडिओ, संगणक व इंटरनेट, टी.व्ही. ची उसनवारी शिक्षण विभागालाच करावी लागणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्राथमिकच्या १२८२ तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या २७४ अशा शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या ७७४ प्राथमिक शाळांपैकी १५९ शाळांमध्ये संगणकाची सुविधा आहे. खासगी शाळांमध्ये नेमके किती संगणक, टिव्ही किंवा रेडिओची व्यवस्था आहे, याचा लेखाजोखा शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. पंतप्रधान मोदी यांचा संदेश विद्यार्थ्यांंपर्यंंत पोहोचविण्यासाठी जनरेटर, टिव्ही, रेडिओ, संगणक आदींची व्यवस्था करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला, टिव्ही किंवा रेडिओची सुविधा उपलब्ध कशी करावी, याचा ताळमेळ बसविण्यात शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांची धावपळ सुरू होती. पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांंंपर्यंंंत पोहोचविण्याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या १५९ शाळांमध्ये संगणक संच उपलब्ध आहेत. काही शाळांमध्ये लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीमधूनही संगणक संच उपलब्ध असू शकतात. उर्वरीत शाळांनी रेडिओ, टिव्ही किंवा अन्य साधनांची तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या आहेत. विद्युत पुरवठय़ाबाबत काही अडचणी आल्या तर जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)अंबादास पेंदोर यांनी सांगीतले.
** विद्युत जोडणी
जिल्हा परिषदेच्या दुर्गम व डोंगराळ भागातील शाळांपर्यंंंंत अद्यापही विद्युत जोडणी पोहोचली नाही. त्यामुळे अशा शाळांमध्ये जनरेटर व टिव्ही किंवा रेडिओची व्यवस्था करण्याच्या सूचना शालेय व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात विद्युत घेऊन टिव्ही लावणे किंवा रेडिओवरून संदेश ऐकविणे, ही व्यवस्था होणार आहे.
** माध्यमिक शाळा २७४
वाशिम जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा एकूण २७४ शाळा आहेत. यापैकी जवळपास ६0 टक्के शाळांमध्ये टिव्ही, रेडिओ, संगणकाची व्यवस्था आहे. उर्वरीत ४0 टक्के शाळांना, पंतप्रधान मोदी यांचा संदेश विद्यार्थ्यांंपर्यंंत पोहोचविण्यासाठी टिव्ही, रेडिओ किंवा अन्य साधनांची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
** न.प. शाळा
वाशिम शहरासह रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या चार नगर परिषद हद्दीतील नगर परिषदेच्या ६0 टक्के शाळांमध्येही टिव्ही, संगणक किंवा रेडिओची सुविधा नाही. विद्युत पुरवठा खंडित झाला तर जनरेटरची व्यवस्थाही नाही. ५ सप्टेंबर रोजी किमान संदेश ऐकण्यापुरती तरी व्यवस्था लावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.