जनुन्याला प्रशासनाकडून सापत्न वागणूक
By Admin | Updated: November 16, 2014 01:40 IST2014-11-16T01:29:10+5:302014-11-16T01:40:34+5:30
मंगरुळपीर तालुक्याती प्रकार, दोन महिन्यांपासून गावातील अंधार कायम.

जनुन्याला प्रशासनाकडून सापत्न वागणूक
मंगरुळपीर : तालुक्यातील चोरद गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या जनुना या आदिवासी गावात गेल्या दीड दोन महिन्यांपासून रात्रीची वीज गायब झाल्याने दर्या-खोर्यातील गाव अंधारात बुडाले आहे. या आदिवासी गावाला सिंगल फेज योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनुना खु. या १00 टक्के आदिवासी गावाला किन्हीराजा सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जात असून, मागील दीड-दोन महिन्यापासून दिवसा दिल्या जाणार्या थ्री फेज वीज पुरवठय़ामुळे तेथील नागरिकांना रात्री अंधाराच्या काळोख्यात जीवन जगावे लागत आहे, या गावाला सिंगल फेज योजनेचा लाभ देण्यात यावा, याकरिता जिल्हाधिकारींना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील आदिवासी समाज बांधव अनेक समस्यांचा सामना करीत असून, त्यांना न्याय देण्यासाठी कोणाचाच पुढाकार मिळत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावाला अद्यापही पक्का रस्ता नाही, त्यामुळे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर त्यांना बहिष्कार टाकावे लागले. बहिष्कारानंतर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष देईल, अशी त्यांना आशा होती; परंतु प्रशासनाकडून अधिकच दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही तेथील नागरिक करीत आहेत.