तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला पालकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:25+5:302021-08-14T04:47:25+5:30
राज्य शासनाने इंग्रजी व मराठी शाळा तात्पुरत्या बंद केल्यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले ...

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला पालकांची पसंती
राज्य शासनाने इंग्रजी व मराठी शाळा तात्पुरत्या बंद केल्यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरीदेखील आम्ही पूर्ण शुल्क का भरायचे, असा प्रश्न इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या पालकांना पडला असून, कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेल्याने हताश होऊन अनेक पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून दाखला काढून आपली मुले जिल्हा परिषद शाळेत टाकण्यास सुरुवात केली आहे. यात जि.प. शाळा व शालेय शिक्षण समिती, शैक्षणिक क्षेत्रात काय बदल करणार, याकडेच पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. हा बदल भविष्यात मराठी शाळेचे भविष्य निश्चितच बदलणार यात तिळमात्र शंका नाही.
...........
खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली...
तालुक्यातील इंग्रजी शाळांची फी भरून भरून पालकवर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपले पाल्य खासगी माध्यमाच्या अनुदानित शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे यावर्षी खासगी व्यवस्थापनाच्या सेमी इंग्रजी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा मराठी शाळांची पटसंख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.
...............
घरोघरी पुरवला सेतू अभ्यासक्रम...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी ज्या मुलांकडे मोबाइल नाही त्यांच्या घरोघरी जाऊन स्वखर्चाने सेतू अभ्यासक्रमाच्या पीडीएफ पोहोचवल्या आणि सर्व स्वाध्याय पेपर सोडून घेतले यावरून त्या शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रति तळमळ दिसून येते.
..............
‘यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आणि खासगी माध्यमाच्या अनुदानित शाळांची पटसंख्या वाढली आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे सर्व शिक्षक वर्ग तत्पर आहेत. सध्या सुरू असलेला सेतू अभ्यासक्रमसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या शिक्षकांनी पोहोचवला आहे. गजानन परांडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, मालेगाव