सोयीच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:13+5:302021-08-27T04:44:13+5:30
वाशिम : माध्यमिक शालांत परीक्षेचा मूल्यमापनावर आधारित निकाल लागल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात सोयीच्या महाविद्यालयात ...

सोयीच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशाला पसंती
वाशिम : माध्यमिक शालांत परीक्षेचा मूल्यमापनावर आधारित निकाल लागल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यावर विद्यार्थ्यांचा भर असल्याने काही महाविद्यालयात क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची आणि त्यामुळे इतर महाविद्यालयाच्या प्रवेशांवर परिणाम होऊन तुकडी कमी होणे, शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर जि. प. शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
वाशिम जिल्ह्यात १५ जुलैपासून कोरोनामुक्त गावांत अकरावी, बारावीच्या १७९ शाळा आहेत. या शाळांतील अकरावीच्या प्रवेशाची क्षमता जवळपास १७२०० असून, राज्यभरात दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करण्याची आणि त्यामुळे संबंधित महाविद्यालयात अकरावीला क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश होण्याची शक्यता आहे. या प्रकारातून काही महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशावर परिणाम होऊन तुकडी कमी होणे, शिक्षक अतिरिक्त ठरणे, असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे निर्देेश सर्व जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाला शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात होत आहे.
--------------------
शिक्षण उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनने अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे या संदर्भात तक्रारही केली आहे. त्याची दखल घेऊन शिक्षण उपसंचालकांनी जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठविले आहे. त्यावरून जि.प. शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशाबाबत सर्व महाविद्यालयांना दक्षता बाळगून क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या आहेत.
--------------------
प्रवेश रद्द करून प्रशासकीय कारवाई
अकरावीच्या वर्गात कोणत्याही शाळेने निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास हे प्रवेश रद्द करून प्रशासकीय कारवाई शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे. जि. प. शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देऊन आवश्यक दक्षता बाळगण्याचेही सूचित केले आहे.
-----------
कोट : जिल्ह्यात अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रतिसादच अद्याप मिळत नसल्याने क्षमतेपेक्षा खूप कमी प्रमाणात प्रवेश होत असल्याची माहिती आहे.-रमेश तांगडे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक),
जि.प. वाशिम,
---------
अकरावीच्या शाळा- १७८
प्रवेश क्षमता -१७०००
अकरावीच्या तालुकानिहाय शाळा व प्रवेश क्षमता
तालुका - अकरावीच्या शाळा - प्रवेश क्षमता
वाशिम - ३५ - ४३८०
कारंजा - ३० - २२७०
रिसोड - ३४ - ४५९०
मालेगाव- २७ - २०१४
मंगरुळ - २८ - २००७
मानोरा- २४ - १८८८