मराठीत साद, लोकांचा प्रतिसाद
By Admin | Updated: October 7, 2014 23:28 IST2014-10-07T23:24:22+5:302014-10-07T23:28:18+5:30
खामगाव येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून साधला लोकांशी संवाद.

मराठीत साद, लोकांचा प्रतिसाद
बुलडाणा : मी असं एकलं होतं, खामगाव जिल्हा बनणार आहे. झाला का? रेल्वे सुरू होणार होती, झाली का? जिगाव प्रकल्पाचं काय झालं? ..किती वेळा सीएम आले अन् गेले; पण काहीच झालं नाही.. हो ना. या शब्दात चक्क मराठी भाषेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत उपस्थित लाखो जनसमुदायाला साद घातली..लोकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद देत सारे वातावरण मोदीमय करून टाकले. मैदानात, मैदानाच्या भिंतीवर, झाडांवर, आजूबाजूच्या इमारतींवर, पाण्याच्या टाकीवर; जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी असल्याचे चित्र सभास्थळी बघायला मिळाल्याने ही सभा रेकॉर्ड ब्रेक ठरली.
येथील शासकीय तंत्रनिकेतन मैदानात सभा पार पडली. ३८ डिग्रीपर्यंत असलेल्या तापमानातही मतदारांची गर्दी ओसंडून वाहत होती. सकाळी १0 वाजतापासून तर मोदींची सभा आटोपत असतानाही ४ वाजेपर्यंत नागरिक सभास्थळी येतच होते. अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील उमेदवारांची संयुक्त सभा असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले; तसेच नरेंद्र मोदी यांची सध्या क्रेझ असल्यामुळे सभास्थळी सकाळी दहा वाजतापासून नागरिकांचे येणे सुरू झाले होते. जवळपास दोन किमी अंतरापासून वाहनांना बंदी करण्यात आली होती.