कोरोना लसीकरणातही पोलीस ‘दादा’च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST2021-02-14T04:37:52+5:302021-02-14T04:37:52+5:30
संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, दुस-या टप्प्यात गत १३ ...

कोरोना लसीकरणातही पोलीस ‘दादा’च !
संतोष वानखडे
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, दुस-या टप्प्यात गत १३ दिवसांपासून अन्य शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचा-यांना लस दिली जात आहे. लस घेण्यात पोलीस आघाडीवर असून, नगर परिषद व नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी द्वितीय स्थानी आहेत.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणा-या कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस दुस-या टप्प्यात जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. दुस-या टप्प्यात पोलीस, महसूल, नगर परिषद व नगर पंचायतीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचा-यांची लसीकरणाबाबत नोंदणी सुरू आहे. पोलीस विभागातील २१२७, नगर परिषद व नगर पंचायत विभागातील ६३६, महसूल विभागातील ९१० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित असून, कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे आरोग्य विभागाने वारंवार स्पष्ट केले आहे. कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली जात असल्याने लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. कोविशिल्ड लस घेण्यात पोलीस विभाग आघाडीवर असून, त्याखालोखाल नगर परिषद व नगर पंचायत अधिकारी, कर्मचा-यांनी लस घेतली आहे. महसूल विभाग तृतीय स्थानी आहे.
०००
कोट बॉक्स
दुस-या टप्प्यात महसूल, पोलीस, नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस उपलब्ध झाले असून १४, १५ फेब्रुवारीपासून आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक वाशिम
०००
बॉक्स
जि.प. अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ८६० जणांची नोंदणी झाली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या अधिकारी, कर्मचा-यांचे लसीकरण सुरू होईल.
०००
बॉक्स
आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस
पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या अधिकारी, कर्मचा-यांना १४ फेब्रुवारीपासून कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
०००००
दुस-या टप्प्यात प्राप्त लसीचे डोस - ११,०००
००
विभाग उद्दिष्ट लसीकरण टक्केवारी
पोलीस २१२७ १११८ ५२
नगर परिषद ६३६ २८६ ४५
महसूल ९१० ३७६ ४१
०००