महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 15, 2017 01:27 IST2017-05-15T01:27:51+5:302017-05-15T01:27:51+5:30
चांदई येथील घटना : पोलिसांकडून कसून चौकशी

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : तालुक्यातील चांदई येथील रमाबाई बाळू डवे (वय ५१) या महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी रमेश मधुकर काकड याला न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यास १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी रमेश काकड (वय ५३) हा मृतक रमाबाई डवे यांच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन त्यांची छेडखानी करीत मानसिक त्रास देऊन छळ करीत होता. त्या छळाला कंटाळून रमाबाईने गावातीलच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद चांदई येथीलच हिंमत मारोती पिसे यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती.
ही घटना ३० मार्च २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम १७४ नुसार प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सदर आकस्मिक नोंदीच्या तपासावरून आरोपी रमेश काकड याच्याविरूद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी रमेश काकड याला १२ मे रोजी अटक करून १३ मे रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीस १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.