सर्जा-राजाच्या जोडीने वेधले लक्ष; वाशिम जिल्ह्यात पोळा सण उत्साहात
By संतोष वानखडे | Updated: September 14, 2023 17:54 IST2023-09-14T17:54:19+5:302023-09-14T17:54:26+5:30
पोळा सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल आकर्षक, सर्वांपेक्षा अधिक सुंदर, उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात.

सर्जा-राजाच्या जोडीने वेधले लक्ष; वाशिम जिल्ह्यात पोळा सण उत्साहात
वाशिम : बैलांप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. गुरूवारी (दि.१४) वाशिम जिल्ह्यात पोळा सण उत्साहात साजरा झाला असून, सजविलेल्या सर्जा-राजाच्या जोड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
पोळा सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल आकर्षक, सर्वांपेक्षा अधिक सुंदर, उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. गुरूवारी सकाळीच शेतकऱ्यांनी नदी, तलावातून बैल पोहाडून आणले. दुपारी बैलांचा साजश्रृंगार केला. बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे असा साज चढविला. सायंकाळी ४ वाजतानंतर वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या शहरांसह ग्रामीण भागात नियोजित ठिकाणी बैलांना एका रांगेत उभे करून पोळा भरविण्यात आला.