पुराव्यानंतरच दाखला द्या!
By Admin | Updated: April 19, 2017 01:11 IST2017-04-19T01:11:45+5:302017-04-19T01:11:45+5:30
उपनिबंधकांचे निर्देश : गुरांच्या बाजारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

पुराव्यानंतरच दाखला द्या!
रिसोड / वाशिम: जनावरांची कोणत्याही प्रकारे पाहणी न करताच खरेदी-विक्रीची अधिकृत पावती दिली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारी समोर आणला. याची दखल घेत यापुढे ओळखीचा पुरावा आणि जनावर पाहणी केल्यानंतरच ‘दाखला’ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले.
चोरीच्या जनावर विक्रीला पायबंद बसावा, जनावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सहकार व पणन विभागाने काही बंधने घालून दिलेली आहेत. ही बंधने गुरांच्या बाजारात पाळली जात नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली होती. त्यानुसार रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम यासह अन्य बाजार समितीतील गुरांच्या बाजारात पाहणी केली असता काही ठिकाणी ओळखीचा पुरावा मागितला जातो तर काही ठिकाणी कोणताही पुरावा न मागता व जनावरांची पाहणी न करताच अधिकृत पावती दिली जात असल्याचे आढळून आले. हा प्रकार बहुतांश बाजार समितीतील गुरांच्या बाजारात कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाच्या सूचना असतानाही, गुरांच्या बाजारात पावती बनविताना या नियमांकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. चोरीच्या जनावरांच्या विक्रीला रोख लावणे आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे या उद्देशाने सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाने दिलेला जनावर मालकी हक्काचा दाखला पशुपालकाने सोबत आणणे बंधनकारक आहे; मात्र असा कोणताही ओळखीचा पुरावा न दाखविता आणि जनावरांची पाहणी न करताच गुरांच्या बाजारात खरेदी-विक्रीचा दाखला दिला जात असल्याचे स्टिंग आॅपरेशनने समोर आणले होते. याची दखल घेत खरेदीदार व विक्रेता यांचा ओळखीचा पुरावा घ्यावा तसेच जनावरांची पाहणी करावी, त्यानंतरच दाखला देण्यात यावा, अशा सूचना उपनिबंधकांनी दिल्या. गुरांच्या बाजारात चोरीच्या जनावरांची विक्री होऊ नये म्हणून बाजार समिती प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी, अशा सूचनाही उपनिबंधक खाडे यांनी केल्या.