‘ई-क्लास’ जमिनीवर वृक्षारोपणाचे नियोजन!
By Admin | Updated: May 15, 2017 14:05 IST2017-05-15T14:05:56+5:302017-05-15T14:05:56+5:30
या जमिनीवर १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण केले जाणार आहे.

‘ई-क्लास’ जमिनीवर वृक्षारोपणाचे नियोजन!
वाशिम : वृक्षारोपण मोहिम अधिक प्रभावी राबविण्यासाठी आता ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या ई-क्लास जमिनींवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. या जमिनीवर १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण केले जाणार आहे. देखभाल दुरूस्ती व संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या ई-क्लास जमिन व जागेवरील अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. वृक्षारोपणामुळे सदर अतिक्रमण निघण्यासोबतच वृक्ष लागवडही होणार आहे. ई- क्लास जमिनीतील वृक्षतोडीमुळे गावातील गायरान नष्ट होत आहे. या जमिनीवर पुन्हा नव्याने वृक्ष लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि गायरान तयार झाल्यामुळे गावातील जनावरांना चारा उपलब्ध होईल, हा दृष्टिकोन समोर ठेवून वृक्षारोपणाचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी स्पष्ट केले. १ जुलै ते ७ जुलैदरम्यान वृक्ष लागवड सप्ताह राबविला जाणार असून या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक हजार वृक्ष लागवड करण्याच्या सूचना पाटील यांनी ग्रामपंचायतींना केल्या.