प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:45+5:302021-09-06T04:45:45+5:30

वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती होण्यासाठी प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी महात्मा गांधी ...

Planning to make water available for irrigation to everyone's farm | प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन

प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन

वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती होण्यासाठी प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून करावयाच्या कामांचा गावनिहाय तंत्रशुद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या. ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, दांगट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नंदकुमार म्हणाले, वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ‘मनरेगा’अंतर्गत जलसंधारणाची कामे करून गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच थांबविण्याचे नियोजन करावे. या अनुषंगाने गावनिहाय ‘जीएसआय’ आधारित आराखडा तयार करावा. पहिल्या टप्प्यात ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत निवड झालेल्या मानोरा व मालेगाव तालुक्यांतील गावांचे सर्वेक्षण करून आराखडे तयार करावेत. यासोबतच जिल्ह्यात फळबाग लागवड, शेतमालासाठी गोडाउन उभारणीसाठीसुद्धा प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या.

००००००

अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना

जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातील अपूर्ण कामांचे सर्वेक्षण करून त्या कामांची सद्य:स्थितीविषयक माहिती संकलित करावी. तसेच ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यात नवीन जॉबकार्ड तयार करणे, तसेच बंद असलेले जॉबकार्ड कार्यान्वित करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचनाही नंदकुमार यांनी दिल्या.

Web Title: Planning to make water available for irrigation to everyone's farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.