स्वखर्चातून तलावातील गाळाचा उपसा!
By Admin | Updated: April 15, 2017 01:45 IST2017-04-15T01:45:35+5:302017-04-15T01:45:35+5:30
कोंडाळा येथील ग्रामस्थांचा पुढाकार : तलावातून बाहेर पडला हजारो ट्राली गाळ

स्वखर्चातून तलावातील गाळाचा उपसा!
हरिभाऊ गावंडे - कोंडाळा महाली
सिंचनासाठी पाणी मिळावे, तद्वतच गावात नेहमी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, या उदात्त हेतूने ग्रामस्थांनी शासकीय योजनेवर विसंबून न राहता स्वखर्चातून पाझर तलावातील गाळ हटविण्याचा निर्धार केला. पाहता-पाहता या सकारात्मक कामासाठी गावातून लाखो रुपये निधीदेखील गोळा झाला. त्यातून तलावातील हजारो ट्राली गाळ हटविण्यात ग्रामस्थांना यश मिळाले.
कोंडाळा महाली या गावाची २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली होती. मात्र, जिल्ह्याच्या कृषी विभागाने त्यात खोडा घालून गावाचा समावेश ‘वॉटर न्युट्रल’मध्ये केल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातून वगळण्यात आले. गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या, शेळया, कोंबडया यासह सोयाबीन, तूर या पिकांना जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी गावात उपलब्ध असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिल्यामुळे गावात जलयुक्त शिवार अभियानातून कुठलीच कामे झालेली नाहीत.
दुसरीकडे सद्यस्थितीत गावातील पाझर तलावामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा शिल्लक नसल्याने गुरा-ढोरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच जलयुक्त शिवारमधून गावाला वगळल्यामुळे जलसंधारणाची कोणतीच कामे कोणत्याच योजनेतून किंवा कोणत्याही विभागाकडून यावर्षी करण्यात आली नाहीत. असे असताना कोंडाळा महाली येथील शेतकरी, ग्रामस्थांनी पाझर तलाव कोरडा पडल्यानंतर शासकीय योजना अथवा अनुदानाची वाट न पाहता हजारो ट्रॉली गाळाचा उपसा स्वखर्चाने करुन जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.
तथापि, कृषि विभागाने खोडा घातला नसता, तर जलयुक्त शिवारमधून गावातील पाझर तलावाचा गाळ जेसीबी मशीनने ट्राली भरून देण्याचा खर्च शासनाकडून मिळाला असता.
गावकऱ्यांच्या पुढाकारातून सध्या गावातील हा पाझर तलाव गाळमुक्त झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी किमान एकवेळ या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांच्या कामाचे कौतुक तरी करावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.