रेतीची अवैध वाहतूक करणा-या वाहनधारकास १३ हजारांचा दंड
By Admin | Updated: November 15, 2014 01:09 IST2014-11-15T01:09:36+5:302014-11-15T01:09:36+5:30
मालेगावात कारवाई : रेती तस्करांचे धाबे दणाणले.

रेतीची अवैध वाहतूक करणा-या वाहनधारकास १३ हजारांचा दंड
मालेगाव (वाशिम) : शहरात रेतीची अवैध वाहतूक करणार्या एका वाहनधारकाला महसूल प्रशासनाने तब्बल १३ हजार ५00 रुपये दंड ठोठावला आहे. स्थानिक तलाठी अमोल पांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाईने शहरातील रेती तस्कारांचे धाबे दणाणले आहे. मालेगाव तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले आहे. मालेगाव शहर या तस्करीचे केंद्रबिंदू आहे. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसागणिक या रेती तस्करांची हिंमत वाढत चालली आहे. या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तलाठी अमोल पांडे यांनी १३ नोव्हेंबरला एक मोहीम हाती घेतली होती. शहरातील डॉ. सोनोने यांच्या घराजवळ तलाठी पांडे यांनी एमएच 0६ जी ६२२८ क्रमांकाच्या एका वाहनधारकाला अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याप्रकरणी १३ हजार ५00 रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई तलाठी अमोल पांडे, सहायक दत्तराव घुगे, संतोष महाकाळ, आदी कर्मचार्यांनी केली.