बँकांमध्ये गर्दीचा उच्चांक; कोरोनाचा कसा होईल नीचांक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:43+5:302021-05-18T04:42:43+5:30

रिअ‍ॅलिटी चेक वाशिम : तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्ह्यातील बँकांमध्ये सोमवार, १७ मे रोजी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांमधील ...

Peak congestion in banks; How corona will be low! | बँकांमध्ये गर्दीचा उच्चांक; कोरोनाचा कसा होईल नीचांक !

बँकांमध्ये गर्दीचा उच्चांक; कोरोनाचा कसा होईल नीचांक !

रिअ‍ॅलिटी चेक

वाशिम : तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्ह्यातील बँकांमध्ये सोमवार, १७ मे रोजी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांमधील गर्दीच्या या उच्चांकाने कोरोना नीचांकी पातळीवर कसा येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे नियोजन कोलमडल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत तसेच बँकांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तथापि, गर्दी कमी होत नसल्याचे पाहून ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. याउपरही गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात २० मेपर्यंत कडक निर्बंध असून, यामध्ये बँकांना सूट देण्यात आली आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. मागील सलग तीन दिवसांपासून बँका बंद असल्याने सोमवारी वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, मानोरा शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. बँकांमधील आर्थिक व्यवहार हा महत्त्वाचा आहेच. परंतु, बँकांमधील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेणेही आवश्यक ठरत आहे.

००००००

बॉक्स

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग !

बँकांमध्ये तसेच बँकांसमोर प्रचंड गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक जण मास्कचा वापरही करीत नसल्याचे सोमवारी दिसून आले. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार, असा प्रश्न कायम आहे. बँकांमधील गर्दीमुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते.

००००००

००००००

बॉक्स

खाते क्रमांकानुसार दिवस ठरले; पण अंमलबजावणी केव्हा?

गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. मात्र, याची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने गर्दी वाढत असल्याचे सोमवारी दिसून आले. खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ० अथवा १ असल्यास सदर ग्राहकांना बँकेत केवळ सोमवारी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांकाचा शेवटचा अंक २ किंवा ३ असल्यास मंगळवारी, ४ किंवा ५ असल्यास बुधवारी, ६ किंवा ७ असल्यास गुरुवारी आणि ८ किंवा ९ असल्यास शुक्रवारी बँकेत प्रवेश दिला जाईल, असे आदेश आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गर्दीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.

००००

००००००

बॉक्स

गावनिहाय नियोजन असावे

खरीप हंगाम जवळ येत असल्याने पीककर्ज व अन्य कामांसाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात सेवा सहकारी सोसायटी आहे. २० ते २५ खेडे मिळून एका ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. त्यामुळे २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांची एका ठिकाणी गर्दी होत आहे. गर्दी टाळण्याचा प्रयत्न म्हणून सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून संबंधित गावातच शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम उपलब्ध कशी करून देता येईल, या दृष्टीने नियोजन करावे, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

00000000000

कोट बॉक्स

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनीदेखील कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या जातील.

- शण्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Peak congestion in banks; How corona will be low!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.