सहव्याधी असलेल्या क्षयरुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:15+5:302021-07-30T04:43:15+5:30
वाशिम : एचआयव्ही, मधुमेह यासारख्या सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या क्षयरुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्यावे तसेच क्षयरुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांना ...

सहव्याधी असलेल्या क्षयरुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्या
वाशिम : एचआयव्ही, मधुमेह यासारख्या सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या क्षयरुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्यावे तसेच क्षयरुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांना इतर आजार होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २९ जुलै रोजी झालेल्या जिल्हास्तरीय टीबी फोरम, टीबी-कोमॉर्बिडीटी समन्वय समितीच्या सभेत दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पंचायत समिती सदस्य गजानन गोटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. व्ही. देशपांडे, डॉ. लक्ष्मीकांत राठोड, डॉ. प्रसाद शिंदे, रवी भिसे, डॉ. पंढारकर, डॉ. मिलिंद लाहोटी, डॉ. सतीश परभणकर, एस. डी. लोनसुने यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात जास्त क्षयरुग्ण आढळणाऱ्या भागांवर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी सातत्याने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांचा शोध घेण्यासाठी एकत्रित सर्वेक्षण मोहीम राबवीत असताना प्रत्येक कुटुंबाला भेट देवून अचूक माहिती संकलित होणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणामध्ये आढळणाऱ्या संशयित व्यक्तींची तातडीने क्षयरोगविषयक चाचणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
०००००००००००००
झोपडपट्टी परिसरात तपासणी मोहीम राबवा
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, मजुरांची लोकवस्ती, झोपडपट्टी परिसरात नियमितपणे आरोग्य तपासणी मोहीम राबवावी. या परिसरात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करावी. क्षयरोगामधून बरे झालेल्या महिलांची मदत घेऊन इतर महिला रुग्णांमध्ये क्षयरोग उपचाराविषयी असलेले गैरसमज दूर करावेत. ग्रामीण भागातील क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या आवश्यक चाचण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही पंत यांनी दिल्या.
००००००
६९१ क्षयरुग्णांपैकी २० जणांना एचआयव्ही
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देशपांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. परभणकर यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या क्षयरुग्ण शोध मोहिमेची माहिती दिली. सहव्याधीविषयक तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६९१ क्षयरुग्णांपैकी २० जणांना एचआयव्ही, २४ जणांना मधुमेह दिसून आले. तसेच २३ जणांना तंबाखूचे व्यसन होते, त्यापैकी १७ रुग्णांनी समुपदेशनानंतर तंबाखू सोडल्याचे त्यांनी सांगितले.