चुरशीच्या लढतीत पाटणीं विजयी

By Admin | Updated: October 20, 2014 01:13 IST2014-10-20T00:56:57+5:302014-10-20T01:13:07+5:30

कारंजा-मानोरा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटणी विजयी.

Patni won in the match of Churashi | चुरशीच्या लढतीत पाटणीं विजयी

चुरशीच्या लढतीत पाटणीं विजयी

कारंजा- राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गत १५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर कारंजा-मानोरा मतदारसंघात विजयाची माळ कोणाच्या गळय़ात पडते, याबाबतची उत्सुकता अखेर १९ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. अगदी नामांकन दाखल करण्यापासून सातत्याने संभ्रम वाढविणार्‍या कारंजा-मानोरा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी भारिप- बमसंचे मो. युसूफ पुंजानी यांचा अवघ्या ४ हजार १४७ मतांनी पराभव करून या मतदारसंघात दुसर्‍यांदा विजय प्राप्त केला.
विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर अमूक ठिकाणी तमूक पक्षाचा उमेदवार निवडून येणार, एखाद्या ठिकाणी अपक्ष बाजी मारणार, मत विभाजनाचा फटका बसून प्रमुख दावेदार पराभूत होणार, अशा प्रकारच्या चर्चांंना सर्वत्र ऊत आला होता.
या मतदारसंघात सुरुवातीपासूनच कोणत्याही उमेदवाराचा स्पष्ट प्रभाव दिसून आला नाही. भाजपचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष ठाकरे, कारंजाचे माजी आमदार प्रकाश डहाके अशा दिग्गज उमेदवारांच्या तोडीला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि भारिप-बमसंने युवा उमेदवारांना तिकीट देऊन सर्वांना संभ्रमात टाकले.
भारिप-बमसंने मो. युसूफ पुंजानी यांना, तर मनसेने रणजीत जाधव यांना उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांनी पक्षाने टाकलेला विश्‍वास बव्हंशी सार्थच ठरविला. प्रथमच विधानसभा निवडणूक लढविणार्‍या या दोन्ही युवा उमेदवारांनी दिग्गजांनाही मागे टाकले. युसूफ पुंजानी यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत मतदारांना आपल्याकडे आकर्षित केल्यामुळे दिग्गजांना चांगलाच घाम फुटला; परंतु राजेंद्र पाटणी यांच्याकडून त्यांना अवघ्या ४ हजार १४७ मतांनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा उमेदवार रणजीत जाधव यांनीही कोणत्याही स्टार प्रचारकाविना मतदारांशी थेट संपर्क साधत आपली हवा निर्माण केली. त्यांनी तब्बल २९ हजार ७५१ मते घेऊन माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि माजी आमदार प्रकाश डहाके यांनाही मागे टाकले. शिवसेनेचे उमेदवार सुधीर कवर यांना मात्र आपली छाप पाडता आली नाही. काँग्रेसच्या ज्योती गणेशपुरे यांच्या रूपाने येथे एकमेव महिला उमेदवार उभा होत्या; परंतु मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले. या ठिकाणी प्रकाश डहाके आणि सुभाष ठाकरे या दिग्गजांना मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागला. प्रकाश डहाकेंनी अपक्ष असूनही सुभाष ठाकरेंच्या तुलनेत बरीच मते मिळविली; परंतु स्थानिक उमेदवार म्हणून मिळालेले पाठबळही त्यामागील कारण असल्याचे म्हणता येईल.
मतमोजणीदरम्यान कारंजा येथील शेतकरी भवनसमोर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांदरम्यान आशा निराशेचा खेळ पाहायला मिळाला. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी विविध उमेदवारांच्या सर्मथकांनी मोठय़ा आशेने शेतकरी भवन परिसरात निकाल ऐकण्यासाठी शहरवासीयांसह ग्रामीण भागातील जनतेनेही हजेरी लावली होती.

Web Title: Patni won in the match of Churashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.