हताश शेतक-यांना समुपदेशनातून दिला जाणार धीर!
By Admin | Updated: November 16, 2014 23:47 IST2014-11-16T23:45:18+5:302014-11-16T23:47:33+5:30
आत्महत्या कमी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात उपाययोजना.
_ns.jpg)
हताश शेतक-यांना समुपदेशनातून दिला जाणार धीर!
संतोष येलकर/अकोला
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत असलेल्या शेतकर्यांना आता समुपदेशनातून मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणार आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. नापिकी आणि कर्जापायी विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्यांचा शोध घेऊन, त्यांना समुपदेशनाद्वारे मानसिक धीर देण्याची उपाययोजना अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कमी पीक उत्पादन झालेल्या आणि नैराश्याचे वातावरण असलेल्या गावांमध्ये शेतकर्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
लोकमत प्रतिनिधीशी बोलताना अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी, तसेच शेतकर्यांमधील नैराश्याचे वातावरण नाहिसे करण्याकरिता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शेतकर्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
*गाव पातळीवर होणार समुपदेशन!
नैराश्यात सापडलेल्या शेतकर्यांचा शोध घेऊन, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांच्याकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
*असे होणार समुपदेशन!
नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्यांच्या अडचणी समुपदेशनात समजून घेण्यात येणार आहेत. अडचणींवर मात करून, त्या सोडविण्याच्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. अडचणींमुळे येणारी नैराश्याची भावना कमी करून, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.