एसटी प्रवास आरक्षणाकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:55+5:302021-03-25T04:39:55+5:30

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरू झाला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या २०० पेक्षा अधिक येत असताना, कोरोनामुळे होणाऱ्या ...

Passenger back to ST travel reservation | एसटी प्रवास आरक्षणाकडे प्रवाशांची पाठ

एसटी प्रवास आरक्षणाकडे प्रवाशांची पाठ

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरू झाला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या २०० पेक्षा अधिक येत असताना, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फारसा परिणाम जनजीवनावर झालेला दिसत नाही. काही उद्योग, व्यवसाय मात्र थंडावले आहेत. दुसरीकडे एसटीच्या प्रवासी वाहतुकीला समाधानकारक प्रतिसाद लाभत आहे; परंतु एसटीतून परजिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या घटली नसतानाही एसटीत आरक्षण करून प्रवास करण्याबाबत उदासीनता दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून आगारात किंवा ऑनलाईन पद्धतीने एकाही प्रवाशाने जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाण्यासाठी आरक्षण केले नसल्याचे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या वाशिम आगारातील यंत्रणेकडून कळले आहे.

------------------

३०४ बसेस दररोज

१) जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील आगारातून राज्यभरात बसफेऱ्यांची ये-जा सुरू असते. त्यात दरदिवशी जिल्ह्यातून परजिल्ह्यात आणि जिल्ह्याअंतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांची संख्या ३०४ असते. नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, जळगाव, आदी जिल्ह्यात बसेस जातात.

-------------

२) जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या वाशिम येथील आगारातून जिल्ह्यातील ३०४ बसफेऱ्या परजिल्ह्यात किंवा जिल्ह्याअंतर्गत धावत असतानाच परजिल्ह्यातून येणाऱ्या २८५ बसफेऱ्याही दरदिवशी वाशिम आगारातूनच ये-जा करतात. जिल्ह्याच्या प्रमुख चार मार्गावर या बसफेऱ्यांची वाहतूक सुरू असते.

--------

रातराणी केवळ दोन

वाशिम येथील आगारातून लॉकडाऊननंतर रातराणी बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या होत्या. त्या रातराणी बसफेऱ्यांना प्रतिसादही लाभत होता; परंतु कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळल्यानंतर रातराणी फेऱ्यांची संख्या घटली. आता केवळ वाशिम-औरंगाबाद, औरंगाबाद-वाशिम या दोन रातराणी सुरू आहेत.

-----------------

परभणी मार्गावर कमी वाहतूक

जिल्ह्यातील वाशिम-अमरावती, वाशिम-यवतमाळ, वाशिम-अकोला, मंगरुळपीर-अकोला, मंगरुळपीर-पुसद तसेच वाशिम-परभणी मार्गावर एसटीची प्रवासी वाहतूक सुरू असते. त्यात परभणी मार्गावर सद्यस्थितीत बसफेऱ्यांची संख्या खूप घटलेली आहे. इतर मार्गांवर मात्र दिवसभर शेकडो बसफेऱ्यांची वाहतूक सुरू असते.

----------------

आरक्षणाचे प्रमाण शून्य

जिल्ह्यातील विविध आगारांतून परजिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येचे प्रमाण फारसे घटलेले नाही. तथापि, कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे एसटीत आरक्षण करून प्रवास करण्यास प्रवासी इच्छुक नाहीत. बसमध्ये पुरेशी जागा मिळण्याची शाश्वती असल्यानेही प्रवासी आरक्षण करीत नसल्याने आठवडाभरात आरक्षणाचे प्रमाण शून्य आहे.

----------

कोट : एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसते. बसफेºयांची संख्या कमी केली नसून, परजिल्ह्यात जाणाऱ्या जवळपास सर्वच बसफेऱ्या सुरू आहेत. एसटीच्या आरक्षित प्रवासाला मात्र प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. आगारातून आणि ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करण्याचे प्रमाण घटले आहे.

- विनोद इलामे,

आगारप्रमुख, वाशिम

===Photopath===

240321\24wsm_1_24032021_35.jpg

===Caption===

वाहतूक सुरळीत: प्रतिसाद समाधानकारक

Web Title: Passenger back to ST travel reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.