पक्षअस्तित्वाच्या लढाईत काँग्रेसची सरशी
By Admin | Updated: October 20, 2014 00:58 IST2014-10-20T00:58:13+5:302014-10-20T00:58:13+5:30
अमित झनकांनी जिल्ह्यात राखले काँग्रेसचे अस्तित्व : मतपेटीतून उघडले वास्तव, लढत दुरंगीच.

पक्षअस्तित्वाच्या लढाईत काँग्रेसची सरशी
वाशिम : सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी ही लढाई असल्याचे स्पष्ट करत रिसोड मतदारसंघात स्वबळावर उडी घेतली होती. या प्रत्येक पक्षाला रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदार राजा मतपेटीतून काय उत्तर देतो, याची उत्सुकता सर्वांंनाच लागली होती. प्रत्यक्षात १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीतून मतदार राजाने आपला कौल दिला असून, काँग्रेसचे अमित झनक यांनी पुन्हा एकदा रिसोड मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे.
युती, आघाडीच्या ह्यएकला चलो रेह्णच्या भूमिकेने विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळेल, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण असतील, त्यांना मतदारांचा कितपत प्रतिसाद मिळू शकतो, या विषयी चर्चेच्या फैरी विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यापासूनच झडू लागल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने अमित झनक, भारतीय जनता पार्टीकडून अँड. विजय जाधव रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाराव खडसे पाटील, शिवसेनेने विश्वनाथ सानप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजू पाटील राजे, भारिप-बहुजन महासंघाने डॉ. रामकृष्ण कालापाड, बहुजन समाज पार्टीने सुभाष देवढे पाटील, रिपाइंने मुरलीधर मोरे, राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टीने नूर अली शाह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यासह संतोष बाबर, रमेश अंभोरे, सदानंद तायडे, संजय कांबळे, गणेश भेराणे, भगीरथ भोंडणे, रामचंद्र वानखेडे हे अपक्ष उमेदवार मिळून १६ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. सुरुवातीला बहुरंगी, त्यानंतर तिरंगी व नंतर थेट दुरंगी झालेल्या लढतीत काँग्रेसच्या अमित सुभाषराव झनक यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे संकेत दिले होते.