अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
By Admin | Updated: August 5, 2016 00:02 IST2016-08-05T00:02:55+5:302016-08-05T00:02:55+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील घटना; घातपाताची शक्यता.

अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
मंगरुळपीर, (जि. वाशिम) दि. ४ - तालुक्यातील पिंप्री ते निंबी रस्त्यावर पिंप्री अवगण शिवारात गुरूवारी सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला. या घटनेची माहीती पिंप्री अवगणचे प्रभारी पोलीस पाटील विजय राठोड यांनी सकाळी ११ वाजताचे सुमारास जऊळका पोलीसांना दिली. त्यानंतर मंगरूळपीर व जऊळका ठाणेदार घटनास्थळावर दाखल झाले. मग दोन्ही ठाणोदारांमध्ये हद्दीचा वाद दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहिला. त्यानंतर पिंप्री अवगण व निंबीचे तलाठी घुगे यांना घटनास्थळावर पाचरण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळ पिंप्री अवगण शिवारात असल्याचे सांगितल्यावर सुध्दा दोन्ही ठाणेदारांचे समाधान झाले नाही. अखेर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी घटनास्थळाला भेट दिल्यावर हा वाद संपुष्टात आला. सायंकाळी ५.३५ वाजता मंगरूळपीर येथील वैद्यकीय अधिकार्यांना पाचरण केले. सदर घटनास्थळ जऊळका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्यावर कार्यवाहीस प्रारंभ झाला. सदर मृतदेह अकोला येथील फॉरेन्सीक लॅबवर पाठविण्यात आला. हा मृतदेह नेमका कुणाचा? यातील आरोपी कोण? याबाबत तर्कविर्तक सुरू आहेत.